सुप्रसिद्ध सुफी गायक दिवंगत नुसरत फतेह अली खान यांच्या गायनशैलीत स्वरबद्ध झालेल्या ‘आफ्रीन आफ्रीन’ हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहे. नुसरत फतेह अली खान, त्यानंतर राहत फतेह अली खान आणि इतर अनेक कलाकारंनी या गाण्याला आपआपल्या शैलीत सादर केले. विविध प्रकारच्या गायकांनी सादर केलेल्या या एकाच गाण्याचे तीन वेगवेगळे प्रकार उपलब्ध असल्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या पसंतीनुसार ‘आफ्रीन’ ची निवड करतो.
नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील ‘आफ्रीन आफ्रीन’ हे गाणे ‘कोक स्टुडिओ’ या कार्यक्रमाच्या एका पर्वासाठी रिक्रिएट करण्यात आले होते. राहत फतेह अली खान यांच्या आवाजात या गाण्याला पुन्हा एकदा स्वरबद्ध करण्यात आले. ‘कोक स्टुडिओ’मध्ये राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील ‘आफ्रीन आफ्रीन’ या गाण्याला अनेकांनी पसंती दिली. यू ट्युबवरही या ‘रिक्रिएटेड व्हर्जन’ला अनेकांची दाद मिळाली. पण, काही असेही प्रेक्षक होते ज्यांना हे गाणे खटकले. अशाच काही प्रेक्षकांपैकी एक अब्दुल्ला कुरेशी. या पाकिस्तानी तरुणाने फेसबुकवर त्याच्या आवाजातील ‘आफ्रीन आफ्रीन’ हे गाणे पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर अब्दुल्लाच्या या गाण्याला प्रचंड हिट्स मिळत आहेत. हे गाणे पोस्ट करत त्याने ‘सॉरी कोक स्टुडिओ’ असे म्हणत ‘या गाण्यातील मुख्य कडवेच त्यांच्याकडून वगळण्यात आल्यामुळे, ते गाण्यापासून मी स्वत:ला थांबवू शकत नाही. यासंबंधी कोणाशीही तुलना नको’, असे अब्दुल्लाने लिहिले आहे. अब्दुल्लाच्या या गाण्याला फार थोड्या वेळातच लाखांच्या घरात व्हुज मिळाले. असे असले तरीही त्याच्या या गाण्याला सर्वांचीच पसंती मिळालेली नाही. या गाण्याची तुलना केली जाऊ नये असे अब्दुल्लाने नमूद केलेले असूनही अनेकांनी त्याच्या आणि राहत फतेह अली खान यांच्या गाण्याची तुलना केली आहे. बऱ्याचजणांना त्याने गायलेले गाणे आवडलेही आहे. त्यामुळे ‘आफ्रीन आफ्रीन’ या गाण्याचे तुमच्या आवडीचे व्हर्जन कोणते?