प्रेमिका आणि प्रेमिकांसाठी महत्वाचा असलेला दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर प्रेमाचा नवा अध्याय गिरविण्यासाठी कोण या दिवसाचा अधार घेतो. तर जुने प्रेम पुन्हा फुलविण्यासाठी काहीजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. ‘व्हॅलेंटाइन डे’चे वारे सर्व प्रेमींमध्ये असते हे जसे नाकारता येत नाही तसेच हे फॅड बॉलिवूडने त्यांच्यामध्ये आणले हे देखील नाकारता येत नाही. मग सर्वांना ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेड लावणारी कलाकार मंडळी यादिवशी काय करतात? कोणता अभिनेता कोणासोबत हा दिवस साजरा करणार? कोणती अभिनेत्री व्हॅलेंटाइन डे’ला कोणत्या अभिनेत्यासोबत फिरताना दिसणार? असे अनेक प्रश्न बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये निर्माण होतात. रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठीही त्याच्या व्हॅलेंटाइन डे विषयी कुतूहल नक्कीच असेल.

बॉलिवूडचा आघाडीचा कलाकार जेवढा त्याच्या चित्रपटांबाबतीत चर्चेत राहिला आहे. कदाचित त्याहूनही जास्त तो अभिनेत्रींच्या प्रेमप्रकरणाबद्दल चर्चेचा विषय ठरत असतो. दीपिका पदुकोनसोबतचे ब्रेकअप असो किंवा कतरिना कैफसोबत त्याने घालविलेला वेळ असो. यासंदर्भात बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच यंदाचा ‘व्हॅलेंटाइन डे’ रणबीर कपूर कोणासोबत असणार याची त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता नक्कीच असेल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरचा यावर्षीतला ‘व्हॅलेंटाइन डे’ खास असणार आहे. रणबीर यावर्षी कुण्या अभिनेत्रीसोबत नव्हे तर अभिनेत्यासोबत प्रेमाचा दिवस साजरा करणार आहे. आता तुम्ही म्हणाला अभिनेत्रीऐवजी अभिनेत्यासोबत रणबीर प्रेमाचा दिवस कसा साजरा करेल. याच कारणही तसच आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. याच निमित्ताने तो १४ फेब्रुवारीला संजय दत्तसोबत असणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे चित्रिकरण १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यादिवशी रणबीर कपूर आणि संजय दत्त एकत्र असणार असल्याचे समजते.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. संजयला जेव्हा त्याच्या जीवनपटाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला होता की, त्याला आनंद आहे की या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत आहेत. पण रणबीरबाबत विचारल्यानंतर संजय फारसा खुश दिसला नव्हता. रणबीरसाठी ही व्यक्तिरेखा साकारणं थोडं कठीण असल्याचे संजय दत्तने म्हटले आहे. रणबीरला माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.असेही संजय दत्तने यावेळी सांगितले होते.