‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचा वाद आता आणखीनच चिघळला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आलेली असतानाच चित्रपटाच्या वाट्याला आलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाहीए. त्यामुळे या चित्रपटाच्या मदतीसाठी आता चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजही पुढे सरसावले आहेत. निर्माते मुकेश भट्ट नुकतेच दिल्लीमध्ये एका शिष्टमंडळासह केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
‘भारतीय सरकार आम्हाला समजून घेईल आणि आम्हाला पूर्ण सुरक्षा पुरवेल या आशेने मी येथे आलो आहे. ज्यांना हा चित्रपट पाहायचा नाही त्यांनी तो पाहू नये. पण, फक्त या एका कारणासाठी त्यांनी इतरांना चित्रपट पाहण्यापासून रोखूही नये’, असे मत मुकेश भट्ट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले.