टीव्ही अभिनेता अनुज सक्सेनाने भ्रष्टाचाराच्या आरोपात दिल्लीमध्ये १६ फेब्रुवारीला आत्मसमर्पण केले. यानंतर दिल्ली पोलिसांनी अनुजला तीन दिवसांसाठी ताब्यात घेतले आहे. अनुजसोबत सह-आरोपी म्हणून बी.के. बंसल यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने अनुजला १७ तारखेपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. यानंतर अनुजने आत्मसमर्पण करुन त्याला विशेष न्यायाधीश गुरदीप सिंग यांच्यासमोर सादर करण्यात आले होते. अनुजच्या वकीलाने अटकपूर्व जामिनासाठी याचिका न्यायालयात दाखल केली होती. पण त्याच्या याचिकेवरच या महिन्याच्या १३ तारखेला उच्च न्यायालयाने सांगितले की, याचा फायदा आरोपीला होणार असल्यामुळे, त्याला कोणत्याही प्रकारची सुट देण्यात येणार नाही.

anuj-saxena-759-1

अनुज सक्सेनाने त्याच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी बंसल याला लाच दिली होती. बंसल याला एका फार्मा कंपनीकडून लाच घेण्याच्या आरोपावरुन १६ जुलै २०१६ मध्येही अटक करण्यात आली होती. या घटनेच्या काही दिवसांनी ५८ वर्षीय त्याची पत्नी सत्यबाला आणि २८ वर्षीय मुलगी नेहा यांनी दिल्ली येथील मधु विहार परिसरातील निलकंठ अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी त्यांच्या पत्रात सीबीआयकडून त्रास होत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.