ती येते आणिक जाते.. पण या चार दिवसांत बरंच काही घडवते. ती म्हणजे जिच्याबद्दल बोलताना आपला आवाज नकळत कमी होतो, जिच्याविषयी कायम कुजबुजच करायची असते, असा अलिखित संकेत तयार झालाय, तीच ती मासिक पाळी. खरंतर हा एक साधा शरीरधर्म आहे. पण त्याबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रद्धा यामुळे त्याचा बाऊ केला जातो. आपल्या समाजात मासिक पाळीविषयी बोलणं म्हणजे एक त्रासदायक गोष्ट आहे. पण आता काहीजण याविषयी बोलू लागले आहेत. सॅनिटरी पॅडवर बनणाऱ्या जाहिरातींमध्ये आता पूर्वीसारखे छुपे शब्द वापरले जात नाहीत. आता जाहिरातींमध्ये सरळ ‘पिरेड्स’ किंवा ‘मेनस्ट्रुएशन’ या शब्दांचा वापर केला जातो. असे असले तरी खऱ्या आयुष्यातील परिस्थिती काही वेगळी आहे. अजूनही दुकानांमध्ये पॅड्स कागदामध्ये किंवा काळ्या पिशवीत टाकून दिले जातात. ज्या दिवसांमध्ये स्त्रिच्या शरीरातून रक्तप्रवाह होत असतो त्याचा उल्लेख करताना ‘ते दिवस’ असे म्हटले जाते.

वाचा : खऱ्या जीवनात कसे आहेत नाना? सुमित राघवनने केला खुलासा

अरन्या जोहर या मुलीने ‘टू ब्लीड विदाउट अ वायोलेन्स’ ही मासिक पाळीवर एक उत्तम कविता तयार केली आहे. मासिक पाळी ही दुर्बलतेची किंवा लपविण्याची गोष्ट नसल्याचा संदेश या कवितेतून देण्यात आला आहे. उलट या दिवसांचा उपयोग एखाद्या स्त्रिला प्रोत्साहित आणि सक्षम करण्यासाठी होऊ शकतो. मासिका पाळी म्हणजे पूर्णविराम नाही. ही कविता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. मासिक पाळीविषयी व्यक्त व्हा ही काही लपविण्याची गोष्ट नाही, असेही त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे. त्याचा आगामी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या जीवनावर आधारित आहे. स्त्रियांसाठी विशेषत: खेडयातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणारे अरुणाचलम् ही पहिली व्यक्ती आहे.

वाचा : लेह आणि सियाचेनमध्ये ‘मराठी तारका’!

‘पॅडमॅन’चे दिग्दर्शन आर बल्की करत असून, चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने सांभाळली आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यादेखील मुख्य भूमिकेत दिसतील. भारतात मानवी शरीराविषयी काहीही बोलणे त्रासदायक असल्याचे राधिकाने मागे म्हटले होते. ती म्हणाली की, ‘या देशात सेक्स, लैंगिकता या विषयांवर बोलणं एक लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे कोणत्याशी शारीरिक किंवा लैंगिक गोष्टीविषयी बोलणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं.’

अक्षय कुमारच्या या आगामी चित्रपटातून नक्कीच एक चांगला सामाजिक संदेश सर्वांना मिळेल.