क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील ‘सचिन: अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. क्रीडाप्रेमी आणि चित्रपट रसिकांसाठी सचिनचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडला जाणं ही एक प्रकारची पर्वणीच आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मास्टर ब्लास्टरच्या या चित्रपटाच्या खास प्रिमियरचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रिमियरला चित्रपट आणि क्रीडा जगतातील काही प्रसिद्ध चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्याआधी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनीही हा चित्रपट पाहिला. प्रसिद्ध चेहऱ्यांच्या गर्दीत पार पडलेल्या या प्रिमियरला छायाचित्रकारांपासून सर्वांच्याच नजरा खिळल्या त्या म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर.

अनुष्का आणि विराट या प्रिमियरला एकत्र आले तेव्हापासूनच त्यांची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांची झुंबड पाहायला मिळाली. चित्रपटाच्या प्रिमियरनंतर ज्यावेळी प्रसारमाध्यमांसमोर ‘सचिन: अ बिलियन ड्रिम्स’विषयी प्रतिक्रिया देण्याची वेळ आली तेव्हा पोडियमजवळ जाण्यापूर्वी विरुष्का एकत्रच बाहेर आले खरे. पण, विराट काही केल्या अनुष्काला त्या ठिकाणी एकटीला सोडत नव्हता. तिच्या वारंवार सांगण्यानंतरही तो, त्या ठिकाणीच उभा होता. एखाद्या लहान मुलाप्रमाणे विराटचा हा हट्ट छायाचित्रकारांनी टिपला असून, सोशल मीडियावर यासंबंधीचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत.

‘फिल्मी बिट’ आणि ‘व्हायरल बॉलिवूड’ या युट्यूब चॅनल्सनीही विराट- अनुष्काची ‘ये साथ छुटेना’ मूमेंट कॅमेरात कैद केली आहे. अनुष्काच्या बऱ्याच सांगण्यानंतर विराट तिला सोडून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी पोडियमपाशी आला. युवराज सिंग सोबतच विराटनेही हा चित्रपट फार आवडल्याचं म्हणत, तो फार प्रेरणादायी असल्याचंही म्हटलं. त्यासोबतच त्याने चित्रपट सर्वांनाच आवडेल असं म्हणत या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. विराट मागोमाग बऱ्याच खेळाडूंनीही हा चित्रपट आवडल्याचं सांगत त्यांचा आनंद व्यक्त केला. ‘सचिन: अ बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटामध्ये सचिन तेंडुलकरच्या जीवनातील बरेच टप्पे दाखवण्यात आले असून, त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

वाचा: Sachin A Billion Dreams Review: फक्त आणि फक्त ‘सचिन… सचिन… सचिन…’