‘निरागसतेच्या गावी… श्रद्धेचा खेळ नवा’ या कथासूत्रावर आधारित नवीन मालिका ‘बालपण देगा देवा’ कलर्स मराठी वाहिनीवर ५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सेवन्थ सेन्स मिडीया निर्मित आणि गणेश पंडीत लिखित ‘बालपण देगा देवा’ ही आगळीवेगळी मालिका प्रेक्षकांशी एक आगळं वेगळं नातं जोडेल यात शंका नाही. या मालिकेमध्ये आजोबा – नातं यांच्या नात्यापलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रभावशाली संवादफेक, डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आणि त्याला विलक्षण अभिनयाची जोड ज्यामुळे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अभाधित स्थान निर्माण केलेले ते विक्रम गोखले या मालिकेद्वारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेमध्ये विक्रम गोखले अण्णांची भूमिका साकारणार असून मैथिली पटवर्धन ही नवोदित बाल कलाकार त्यांच्या नातीची म्हणजेच आनंदी कुलकर्णीच्या भूमिकेत दिसणार आहे. याखेरीज मिलिंद शिंदे, भाग्यश्री राणे, यांच्याही मालिकेमध्ये प्रमुख भूमिका असतील.

वाचा : बिग बींभोवती चाहत्यांची गर्दी पाहून आराध्याची घबराट

श्रध्दा जर डोळस असेल तर माणसाच्या जगण्याला आधार देते. माणूस श्रद्धेच्या बळावर अनेक अडचणींवर मात करू शकतो. दु:ख आणि वेदनेच्या निखाऱ्यावरून हसत हसत चालू शकतो. पण श्रद्धेचा वापर करून स्वार्थासाठी अंधश्रध्दा बळकट केली आणि एखाद्या व्यक्तीचं माणूसपण नाकारून तिला देवाच्या प्रतिमेत कैद केलं तर … ‘बालपण देगा देवा’ या मालिकेमधून मनोरंजनासोबत श्रध्दा, विश्वास आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना आजोबा-नातीचं हळूवार भावनिक नातं उलदडणारी हृदयस्पर्शी कथा बघायला मिळणार आहे. ही गोष्ट अल्लड परंतु हुशार, चौकस, निरागस आणि आजोबांची लाडकी आनंदी या छोट्या मुलीची आहे जीचे आपल्या आजोबांवर जीवापाड प्रेम आहे, तिच्या आजोबांमुळे संस्कारांचा सक्षम असा वारसा तिला मिळाला आहे. अण्णा म्हणजेच केशव कुलकर्णी हे शिस्तप्रिय आहेत त्यांनी आपल्या नातीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. अण्णांचं एकच स्वप्न आहे, त्यांना आनंदीला डॉक्टर बनवायचं आहे. अण्णांचं हे स्वप्न पूर्ण होईल का ? आनंदी आणि अण्णा यांच्या मार्गामध्ये कोणते अडथळे येतील ? अण्णा त्यामधून कसे मार्ग काढतील हे सगळं बघणं रंजक असणार आहे.

vikram-gokhale-1

या मालिकेच्या निमित्ताने बोलताना अष्टपैलू अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, “बालपण देगा देवा या मालिकेमध्ये आजोबा आणि नात याचं नातं हे दुधावरच्या सायीसारखं नाजूक आहे. इतर वयाच्या मुलामुलींपेक्षा आपली नातं अतिशय हुशार आहे, तिला प्रत्येक गोष्टीचे कार्य समजून घेण्याची सतत उत्कट इच्छा आहे याचं आजोबांना कौतुक आहे. तिला अंधश्रद्धांपासून कसं दूर ठेवायचं हे हा आजोबा त्याचे कर्तव्य मानतो. काही तरी भलतं-सलतं परंपरेने सांगितलेले नाही हे तिला सांगणे तसेच तिच्या सर्व प्रश्नांना वेळ मारून न्यायची असे न करता, तिला समजेल अशा भाषेत सांगणारा असा हा आजोबा आहे. आजोबांचा वैदकीय पेशा आहे, तो ती मुलगी हळूहळू शिकतेय या गोष्टीच आजोबाला खूप कौतुक आहे”.