बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची जागा कधीच भरून निघू शकणार नाही.

१९६८ साली चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी १४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहकलाकार म्हणून जास्तीत जास्त भूमिका साकारल्या होत्या. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ते स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाहीत. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ (१९८०) या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या.  ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली.

विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी ‘कुर्बानी’च्या आधी १९७६ मध्ये आलेल्या ‘शंकर शंभू’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर ‘दयावान’ या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही या दोन्ही मित्रांनी एकत्र काम केले. या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की योगायोगाने त्यांच्या निधनाची तारीखसुद्धा एकच ठरल्याचा योग जुळून आला. फिरोज खान यांचेदेखील २७ एप्रिलला निधन झाले होते. आज फिरोज खान यांचा स्मृतिदीन असून त्यांनी २७ एप्रिल २००९ रोजी जगाचा निरोप घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या विनोद खन्ना यांची प्राणज्योतही आज, २७ एप्रिललाच मालवली. इतकेच नाही तर, या दोघांच्याही मृत्यूचे कारणसुद्धा एकच आहे. विनोद आणि फिरोज या दोघांचेही निधन कर्करोगामुळेच झाले. बॉलिवूडमध्ये ‘लेडी किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोज यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

feroz-khan-and-vinod-khanna