एका राघवाशिवाय अर्थात एका सद्गुरूशिवाय दुसऱ्या कशाचीही आशा नको, अपेक्षा नको! (मना राघवेंवीण आशा नको रे) अशाश्वताच्या प्राप्तीच्या आशेनं अशाश्वत अशा जगाचीही आशा नको (मना मानवाची नको कीर्ति तूं रे।). आता चंदन उगाळल्यावर जो सुगंध दरवळतो त्याला कीर्ती म्हणतात. अर्थात चंदन झिजून नष्ट होऊ लागतं तेव्हाचा जो सुगंध त्याला कीर्तिसुगंध म्हणतात. म्हणजेच माणसाच्या हयातीत नव्हे, तर त्यानं देह ठेवल्यावर त्याच्या सत्कर्माची जी लोकस्तुती पसरू लागते ती खरी कीर्ती! आपण मात्र जिवंतपणी होणारा गवगवा, नावलौकिक, स्तुती म्हणजे कीर्ती समजतो. आता आपण एखाद्याची स्तुती तरी खऱ्या खुल्या मनानं किंवा निस्वार्थपणे करतो का? आपली कोणतीच कृती स्वार्थरहित नसते. काही ना काही स्वार्थ प्रत्येक कृतीला चिकटला असतो. त्यामुळे ज्याच्याकडून आपला स्वार्थ साधला जात असतो किंवा साधला जाण्याची शक्यता असते, त्याचीच स्तुती आपण करतो. त्याचीच ‘कीर्ती’ आपण गात असतो. स्वार्थपूर्तीच्या लालसेनं आपण मिंधे होतो. लाचार होतो. परमस्वार्थ असा परमार्थ साधून देणाऱ्या भगवंताची स्तुती न गाता संकुचित स्वार्थ साधून घेण्याच्या अपेक्षेनं आपण माणसाच्या स्तुतीगानात रमतो. या लाचार जगण्याचाच धिक्कार समर्थानी एके ठिकाणी, ‘‘नको दैन्यवाणे जिणें भक्ती उणे!’’ या शब्दांत केला आहे. ‘‘मना राघवेंवीण आशा नको रे मना मानवाची नको कीर्ति तूं रे।’’  या चरणांतही तोच भाव आहे. मुळात जन्म हाच क्षणभंगुर आहे. त्यात माणसाचं बहुतांश जीवन ही ‘मी’ आणि ‘माझे’ याच चौकटीत जखडलेलं आहे. अर्थात त्याच्या जगण्यात निस्वार्थपणा कमीच. आता यालाही अपवाद असलेले आणि माणसाला माणुसकीचं भान आपल्या जगण्यातून आणून देणारे कर्तृत्ववान विविध क्षेत्रांत होऊन गेले आहेत. पण आजवर होऊन गेलेल्या कोटय़वधी मनुष्यसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या फार तुटपुंजी आहे.  बाकी ‘जन्मले आणि मेले’ या श्रेणीतल्या लोकांची संख्या भारंभार आहे. त्यातही जे थोडंबहुत निस्वार्थ जगणं आहे, त्याची जाण लोकांनी ठेवावी, हा सूक्ष्म स्वार्थ आहेच. मग अशा क्षणभंगुर आणि ‘मी’केंद्रित जगण्यात माणूस असं किती कर्तृत्व गाजवू शकतो, ज्याची कीर्ती गायली जावी? तरीही जिथे स्वार्थपूर्तीचा हेतू चिकटतो तिथं माणूस कीर्ती गाण्यात अग्रभागी असतोच. राज्यसत्तेवर स्तुतीसुमनांचा वर्षांव करून आपली धर्मसत्ता टिकवू पाहणारे महाभाग तितकेच स्वार्थकेंद्रित आणि लाचार आहेत, हे आपणंही पाहतोच. या आपल्या लाचार स्वार्थकेंद्रित वृत्तीला समर्थ फटकारत आहेत आणि अशा लाचारीपासून साधकानं तरी दूर झालं पाहिजे, हे मनोबोधाच्या पुढच्या १९व्या श्लोकात बजावत आहेत. हा श्लोक असा:

मना सर्वथा सत्य सोडूं नको रे

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे।

मना सत्य तें सत्य वाचे वदावें

मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें।।१९।।

प्रचलित अर्थ : हे मना, सत्य अशा परब्रह्माला क्षणभरही सोडू नकोस आणि मिथ्या मायेचा बडेजाव वाढवू नकोस. वाचेने जे सत्य आहे ते सत्य म्हणूनच सांग आणि जे असत्य आहे ते असत्य म्हणूनच टाक.

आता या श्लोकाच्या मननार्थाकडे वळू. या श्लोकात दोन मोठे अर्थगर्भ शब्द आले आहेत.. सत्य आणि मिथ्या.. या दोन शब्दांवर कित्येक पानं भरतील इतकं चिंतन, इतका बोध उपलब्ध आहे. तरीही सत्य म्हणजे नेमकं काय, हे उकलत नाही आणि मिथ्या म्हणजे काय, हेदेखील उकलत नाही. त्यातही गोम अशी की, जे सत्य आहे, असं उच्चरवानं सांगितलं जातं तेच मिथ्या वाटतं आणि जे मिथ्या आहे, असं उच्चरवानं साधूसंतही सांगतात, तेच सत्य वाटतं!

-चैतन्य प्रेम