आपलं जीवन शब्दमय आहे. शब्दांशिवाय आपण विचार करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही. शब्दांवरच आपली भावना पोसली जात असते. शब्दच प्रेम वाढवतात आणि शब्दच द्वेषही वाढवतात. शब्दच आधार देतात आणि शब्दच निराधारही करतात. शब्दच आशा पल्लवित करतात आणि शब्दच निराशा निर्माण करतात. थोडक्यात माणसाच्या मानसिक, वैचारिक आणि भावनिक जीवनावर शब्दांचा मोठा व्यापक प्रभाव पडतो. वरकरणी नामही शब्दरूपच आहे! माणूस विचार करतो, पण बरेचदा त्याचं अविचारात कधी रूपांतर होतं, हे त्याला कळतही नाही. माणूस स्वत: अपूर्ण आहे, स्वार्थकेंद्रित आहे आणि त्याची प्रत्येक कृतीही स्वार्थकेंद्रितच आहे. त्याच्या भोवतालची माणसांची गर्दीही त्याच्यासारखीच आहे. त्यामुळे जिथं स्वार्थ साधतो तिथं माणूस दुसऱ्याला शब्दांनी सुखावतो आणि जिथं स्वार्थ साधत नसेल किंवा स्वार्थपूर्तीत बाधा येत असेल तिथं तो दुसऱ्याला शब्दांनी दुखावतोही! शब्दांनीच तो दुसऱ्याला आधार द्यायचा आभास निर्माण करतो आणि शब्दांनीच दुसऱ्याला निराधार केल्याचं भासवतो! थोडक्यात शब्दाचा वापर स्वार्थप्रेरितच असतो. नाम शब्दरूपच आहे, पण ते जणू माझ्या संकुचित जीवनापासून पूर्ण अलिप्त असंच भासतं. ‘सगळं काही ठीक होईल,’ अशी हमी देणारे शब्द ‘नामा’त नसतात. तरीही नामाकडे मन जसजसं वळू लागतं तसतसं सर्व काही ठीक होईल, असं मनालाच वाटू लागतं! मन नामात जसजसं रमू लागतं आणि सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा अभ्यास सुरू होतो तसतसं, परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारता येते! ‘मी नाम घेत आहे तर परिस्थिती माझ्या मनाजोगती होईल,’ ही प्रारंभिक अपेक्षा असते. नाम माझ्या नकळत मला निरपेक्ष करू लागतं. माझं स्वत:चं नाव हेदेखील शब्दरूपच. ते नावही मी निवडलेलं नसतं. तरीही त्या नावाशी माझी सहज एकरूपता होते. ते नाम आणि मी अभिन्न होतो. ना त्या नामाचा मी तासन्तास अभ्यास केलेला असतो, ना त्याच्या स्मरणाची धडपड केलेली असते. अगदी झोपेतही माझं नाव माझ्या अंतरंगात रुतून असतं. म्हणूनच माझ्या नावाचा कोणी ओरडा केला तर मी गाढ झोपेतूनही खडबडून जागा होतो! ‘भगवंता’च्या नामाशी माझी अशी सहज एकरूपता नसते. माझ्या नावात माझा प्रेमभाव असतो, पण भगवंताच्या नामात वरकरणी ना तो भाव असतो, ना प्रेम असतं. माझ्या संकुचित अंत:करणात नामच खरं शुद्ध प्रेम, खरा शुद्ध भाव, खरा अखंड रस आणि खरी अवीट गोडी म्हणजे काय, याची जाणीव निर्माण करतं. दुनिया शब्द देऊन मला फसवते, गुंतवते, अडकवते. माझ्या जीवनातला शब्दांचा हा पसारा शोषून नामच मला जाग आणते, सोडवते आणि मोहभ्रमापासून दूर करू लागते. माझं जीवन कसं आहे? ते संकुचित ‘मी’च्या आधारावरच उभं असल्याची माझी कल्पना आहे. ते मृत्यूनं संपणारं म्हणजेच कालमर्यादित आहे, क्षणोक्षणी घटणारं आहे, अस्थिर आहे; पण भगवंत आणि त्याचं नाम कसं आहे? भगवंत अखंड आहे, अनादि आहे, अजर आहे, अमर आहे, अक्षय आहे, अपार आहे, अथांग आहे आणि म्हणूनच त्याच्याशी जोडणारं नाम हेदेखील अखंड आहे, अनादि, अपार, अजर, अमर, अक्षय आणि अथांग आहे! मग संकुचित जाणिवेत कुढत जगत असलेल्या मला जर व्यापक जाणिवेत स्थित व्हायचं असेल, तर भगवंताशी जोडणाऱ्या व्यापक नामाचाच आधार मला घ्यायला लागेल. माझ्या संकुचित चित्तातील क्षीण भावप्रवाह भक्तीरूपी नदीला मिळाला तर जगण्यातला संकुचितपणा मावळतो आणि ती नदी सद्गुरुमयतेच्या समुद्राला मिळते तेव्हा तो भावप्रवाह खऱ्या अर्थानं व्यापक होतो. ही प्रक्रिया नामाच्या आधारानं सूक्ष्मपणे घडते आणि म्हणूनच सद्गुरू मला नामाच्या मार्गावर वळवीत राहतात.

 

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
model code of conduct, code of conduct,
आचारसंहिता समजून घेताना…
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
savarkar
सर्वसमावेशक दृष्टिकोन