एका सद्गुरूशिवाय आंतरिक ‘बोलण्या’चा दुसरा विषय नसावा, यासाठीचे उपाय आपण पाहिले. आता मुळात सद्गुरूशिवाय आंतरिक ‘बोलण्या’चा दुसरा विषय नसावा, याचा अर्थ काय, ते पाहू. इथे सद्गुरू हा व्यक्तिरूप नव्हे तर तत्त्वरूप आहे. जे परमतत्त्व आहे ते निराकारच आहे, पण ते ज्याच्या योगे प्रगट होतं, ते साक्षात ज्याच्या जीवनात विलसताना दिसतं, ज्याचं आचरण त्या तत्त्वाशी पूर्ण सुसंगत असंच असतं तो सद्गुरू आहे. थोडक्यात सद्गुरूंचं चिंतन म्हणजे नुसतं त्यांच्या रूपाचं वा व्यक्तिमत्त्वाचं चिंतन नाही, तर ते त्यांच्या विचारांचं चिंतन आहे. त्यांच्या विचारांच्या अनुरूप जगण्याचा  प्रामाणिक अभ्यास जसजसा होऊ लागेल तसतसं हे सद्गुरू चिंतन खऱ्या अर्थानं वाढत जाईल! आता जे परम आहे ते संकुचित असू शकत नाही. तेव्हा संकुचित चिंतन आणि मननात गुरफटलेलं जे मन आहे त्याला व्यापकाच्या चिंतन, मननात गुंतवणं हाच सद्गुरू चिंतनाचा खरा हेतू आहे. आता समजा आपण एखाद्या नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणार आहोत, तर मग त्याचा विचार न करता सद्गुरूंचा विचार करीत राहणं चुकीचं नाही का, अशी वरकरणी रास्त वाटणारी शंका कुणाच्या मनात येईलही. थोडा विचार केला की जाणवेल, नोकरीची मुलाखत असो किंवा एखाद्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कुणाला भेटायला जाणं असो; प्रत्यक्षात ती मुलाखत किंवा ती भेट फार थोडय़ा वेळाची असते, पण त्या मुलाखतीच्या किंवा त्या भेटीच्या आधी त्या मुलाखतीबद्दल किंवा भेटीबद्दल माझ्या मनात उलटसुलट विचारांचं किती काहूर माजतं? मग त्या मुलाखतीबद्दल किंवा त्या भेटीबद्दल नेमका विचार करून उरलेला विचार जर शाश्वताच्या चिंतनाकडे वळवता आला तर मनाची किती शक्ती वाचेल! जीवनातल्या अनेक प्रसंगांमध्ये आपली गत अशीच होते. कुणी काही उलट बोललं तर, एखादी घटना मनाविरुद्ध झाली तर, जवळच्या माणसानं मन दुखावलं किंवा आपल्याकडून जवळच्या माणसाचं मन दुखावलं गेलं तर इथपासून ते नोकरी, व्यवसायात किंवा व्यक्तिगत जीवनात प्रतिकूलता जाणवू लागली तर, आपलं मन  उलटसुलट विचारांच्या झंझावातात पाचोळ्याप्रमाणे कसं हेलपाटत असतं! त्यातले कित्येक विचार हे नकारात्मक असतात, मनाचं खच्चीकरण करतात, हेदेखील आपल्या लक्षात येत नाही. एका नकारात्मक विचाराचं बोट घट्ट पकडलं, तर तोच विचार अनंत नकारात्मक विचारांच्या खाईत कसं लोटतो, हेदेखील आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्या अंतरंगात चाललेला विचार, आपलं आपल्याशीच सुरू असलेलं बोलणं हे शाश्वताला धरून आहे की अशाश्वत, अस्थिर, मिथ्या गोष्टींना धरून सुरू आहे, याचं तरी निरीक्षण-परीक्षण सुरू करता येईल? एकदा आंतरिक विचारांच्या प्रवाहाला, आंतरिक ‘बोलण्या’ला शिस्त लागली म्हणजेच ‘‘न बोलें मना राघवेंवीण कांहीं।’’ हे साधलं की बाहेरचं जे बोलणं आहे, त्याकडेही लक्ष जाईल. मग ‘‘जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं।।’’ हेदेखील साधेल आणि मग लोकांशी नाहक सुरू असलेलं जे बोलणं आहे त्यात ‘सुख’ वाटेनासं होईल आणि तेही आटोक्यात आणता येईल. लोकांशी आपलं सदोदित सुरू असलेलं जे बोलणं आहे ते बहुतांश आत्मस्तुती आणि परनिंदा या दोनच गोष्टींनी भरून असतं. बरेचदा आपण आपली अवास्तव स्तुती करण्यात किंवा होऊ देण्यात रममाण असतो आणि अहंकारापायीच दुसऱ्याची िनदा करण्यात दंग असतो किंवा दुसऱ्याची निंदा होऊ देण्यात प्रोत्साहन देत असतो. जेव्हा आंतरिक आणि बाह्य़ बोलण्याकडे बारकाईनं लक्ष जाईल तेव्हाच या आत्मस्तुती आणि परनिंदेनं मनावर किती वाईट संस्कार आपण करीत असतो, हे ध्यानात येईल. मग त्या बोलण्यातला फोलपणाही बोचू लागेल.

– चैतन्य प्रेम

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?