बिल्डिंगच्या खाली उतरताना तिची आणि त्याची नजरानजर झाली. लग्न ठरलं होतं त्याचं…
”किती वेगळा दिसतोय ना? काही दिवसांत दोनाचे चार हात होणार आहेत त्याचे.” त्याला पाहून कल्याणीच्या मनात विचार आला. त्या दिवशी कल्याणी अनपेक्षितरित्या त्याच्या समोर आली होती. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मान खाली घातली. त्याच्या काही सेकंदाच्या नजरानजरेत किती तीव्र वेदना दडल्या होत्या. त्या कल्याणीला कळल्या होत्या पण मनात असूनही त्याच्या वेदनेवर ती फुंकर घालू शकणार नव्हती.

बिल्डिंगमध्ये त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती, ”तो प्रसंग जर घडला नसता तर स्वप्नीलची बायको मी असते” तिने गेटमधून बाहेर पडताना विचार केला. ”असं झालं असतं तर बिल्डिंगमध्येच लग्न करणारे आपण पहिले ठरलो असतो ना? मला लांब माहेरी जाण्याची गरजच पडली नसती. ‘ए’ विंगमधून ‘बी’ विंगमध्ये गेले की झालं काम. अख्खी बिल्डिंगच आली असती लग्नाला. दोन्ही बाजूने. माझ्याकडूनही आणि स्वप्नीलकडूनही. हळदीला तर नक्की कोणाकडे जायचं असाच प्रश्न पडला असता बिल्डिंगमधल्या लोकांना.” कल्याणी मनातल्या मनातच नुसते कल्पनेचे मनोरे रचत होती ”पण आता काही उपयोग नव्हता. बिल्डिंगमधल्या काही नालायक लोकांनी आपला प्रेमाचा डाव अर्ध्यावर विस्कटून टाकला होता,” तिला राग येत होता तेव्हापासून तिने आणि तिच्या कुटुंबियांनी बिल्डिंगमधल्या जवळपास सगळ्याच लोकांशी बोलणं टाळलं होतं. स्वप्नीलच्या लग्नाची लगबग सुरू होती तिला मनातून खूपच वेदना होत होत्या. पण स्वत:ला सावरत ती आपल्या कामाला निघून गेली.

कल्याणी आणि स्वप्नील एकाच शाळेत शिकायचे, स्वप्नील दहावीत होता आणि कल्याणी नववीत. स्वप्नील हुशार होता त्यामुळे कल्याणीला कधी काही अडलं तर तो मदत करायचा. दिवसातील अर्धा तास ती स्वप्नीलच्या घरी जायची. स्वप्नील बीजगणित आणि भूमितीची प्रमेय सोडवायला तिला मदत करायचा, स्वप्नीलची पुस्तकं आणि गाईड्स देखील ती वापरायची. पेपर संपले की तो कल्याणीसाठी प्रश्नपत्रिका जपून ठेवायचा. तिला पुढच्या वर्षी याची मदत होईल, असं म्हणून तो पेपरचा बंडलंच बाजूला ठेवायचा. स्वप्नील एकूलता एक होता, शिवाय त्याला चूलत भावंडही नव्हती. स्वप्नीलच्या आईला मुलगी हवी होती आणि कल्याणीला तर ते आपली मुलगीच मानायचे. त्यामुळे स्वप्नीलच्या घरात कल्याणीचे खूपच लाड व्हायचे. ती कधीही स्वप्नीलच्या घरी जाऊन बिंधास्त राहत होती. स्वप्नील दहावी उत्तम मार्काने पास झाला होता, त्याने अकरावीला सायन्सला अॅडमिशन घेतली.

तर कल्याणी दहावीत गेली होती. कॉलेजमध्ये गेल्यापासून स्वप्नील थोडा बदलला होता. कल्याणीलाही ते जाणवत होतं. कल्याणीशी तो पूर्वीसारखा वागायचा नाही. शक्यतो बोलणं टाळायचा किंवा ती आली की बाहेर जायचा. पण अभ्यासाच्या वेळी मात्र तिला आवर्जून मदत करायचा.
आज कल्याणीचा सोळावा वाढदिवस होता ते त्याला माहिती होतं.
”आज कल्याणीला मनातलं सारं काही सांगून टाकू या”असं म्हणत स्वप्नीलने हातातली वस्तू बॅगेत ठेवली.
”पण अजून कशी आली नाही. रोज तर आईला भेटायला येते” त्याचं अर्ध लक्ष घड्याळ्याकडे होतं.
”आई मी आले. स्वप्नीलकडे जाऊन येते. काकू वाट बघत असतील” कल्याणीने दरवाजा बंद केला आणि जिने उतरून बी विंगमध्ये गेली. .
तिने बेल वाजवली.
”हाय”
” हाय” स्वप्नीलने दरवाजा उघडला. तिला बघताच तो लाजला. ती आली याचा आनंदही त्याच्या चेह-यावर दिसत होता.
”काकू आहेत का घरात?” आत डोकावत तिने विचारले, पण स्वप्नीलच्या उत्तराची वाट न बघता ती सरळ आत शिरली.
”नाही, ती बाजारात गेलीये”
”ओके. मग मी जाते, मला शाळेत जायचं आहे. ती निघणार एवढ्यात स्वप्नीलने तिला अडवलं.
”कल्याणी एक मिनिट थांब ना! आज वाढदिवस आहे ना तुझा?”
”अय्या तुला माहिती होतं. मला वाटलं विसरलास. तू काय आता कॉलेजला जातोस बाबा, तुझ्या असतील ना तिथे शंभर मैत्रिणी, बिल्डिंगमधल्या मैत्रिणीचे वाढदिवस तू का लक्षात ठेवशील?” थोडीशी रागात ती म्हणाली.
त्याने बॅगमधून एक पिशवी बाहेर काढली आणि ती कल्याणीच्या हातात दिली. कल्याणीने लगेच ती उघडून पाहिली.
” हे काय? कसलं पुस्तक आहे हे?” तिने गोंधळून विचारलं.
” पुस्तक नाही, पुस्तकाच्या आतमध्ये काहीतरी आहे. तुझा वाढदिवस आहे ना म्हणून तुझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आणलंय. आता इथे प्लीज बघू नकोस. आई येईल आणि घरीही कोणाला दाखवू नकोस. लपून बघ.”
त्याने बॅग बंद केली. कल्याणी काहिशी गोंधळली. स्वप्नीलने आपल्याला चक्क गिफ्ट दिलंय. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तेही एका मुलाने तिला गिफ्ट दिलं होतं.

शाळेची तयारी करायला तिने घेतली
”आई लवकर वेण्या बांध मला शाळेत जायला उशीर होत आहे” तिची घाई गडबड सुरू झाली.
”उशीर कसला गं? अजून अर्धा तास आहे शाळेत जायला” आई किचनमधून ओरडली.
”नाही पण मला आज लवकर जायचं आहे शाळेत” ती खूपच घाई करत होती कारण तिचं लक्ष त्या पिशवीतल्या पुस्तकाकडे होतं.
”काय बरं असेल त्यात?” ती विचार करत होती.
तिला आता याक्षणी ते पुस्तक उघडून बघायचं होतं, पण स्वप्नीलने जे सांगितलं ते तिला आठवलं. तिने पटकन तयारी केली आणि बिल्डिंगच्या खाली गेली. तिथे कोप-यात आपल्याला कोणी बघणार नाही, याची खात्री करून तिने आपली शाळेची बॅग उघडली आणि त्यातून स्वप्नीलने दिलेले ते पुस्तक बाहेर काढलं. पुस्तक उघडताच तिला ग्रिटिंग कार्ड दिसलं, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ग्रिटिंग कार्ड होतं. ते पाहून ती गालातल्या गालात लाजली. स्वप्नीलकडून असं काहीतरी येणं अनपेक्षित होतं. तिने पुस्तकात ग्रिटिंग लपवलं आणि पुस्तक बॅगेत ठेवणार एवढ्यात एक चिठ्ठी खाली पडली.
” कल्याणी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! खरंतर तुझ्यासमोर मी काहीच बोलू शकत नाही, तू समोर असली की माझी हिंमतच होत नाही. मी मुळातच खूप लाजरा आहे म्हणूनच तुला पत्र लिहितोय. कल्याणी लहानपणापासून आपण एकमेकांना ओळखतो. आठवीपासून तर मी तूझ्यासोबत शाळेत जातोय. तुझ्यासोबत शाळेत जाताना तू माझ्यासोबत असताना मला खूप छान वाटायचं. तुला माहितीय माझ्या वर्गातले सगळेच मित्र मला तुझ्या नावाने चिडवायचे आणि त्यांच्या या थट्टा मस्करीत मला तू कधी आवडायला लागली हे कळलंच नाही. कल्याणी मला तू खूप आवडतेस. तुला अभ्यास शिकवता शिकवता कधी मी तुझ्या प्रेमात पडलो, हे मलाही समजलं नाही. तूझं माझ्या शेजारी बसणं, मन लावून अभ्यास करणं, माझं ऐकणं तुझ्या एक न् एक गोष्टी मला खूप आवडतात. आईलाही तू खूप आवडते. कॉलेजमध्ये सगळ्यांच्या गर्लफ्रेंड आहेत. पण मी ठरवलंय मला गर्लफ्रेंड म्हणून तूच हवी आहेस कल्याणी. आय लव्ह यू कल्याणी. तुझ्या उत्तराची मी वाट पाहतोय. आज तुझा वाढदिवस आहे पण बर्थ डे गिफ्ट मात्र तू मला देणार आहेस”

स्वप्नीलची ती चिठ्ठी वाचून कल्याणीला धडधडू लागलं. आतापर्यंत मनात कधीही न आलेल्या भावना हळूच अल्लड मनाला गुदगुल्या करू लागल्या होत्या. अचानक प्रेमाचा रंग तिच्यावर चढला होता. ती शाळेत जायला गेटबाहेर पडली एवढ्यात तिचं लक्षं गेटकडच्या कोप-यात गेलं. तिथे खिशात हात घालून बिल्डिंगमधल्या काही मित्रांसोबत स्वप्नील उभा होता. तो तिचीच वाट पाहत होता, तिने त्याच्याकडे पाहिलं आणि ती लाजली.
दोन वेण्या, पायात शूज, पाठीवर बॅग लावलेल्या कल्याणीने त्याच्याकडे पाहिलं. त्याला ती तशीच आवडायची. चिठ्ठीमधले शब्द आठवत ती शाळेत पोहोचली. पण तिचं सारं लक्ष खिशातल्या घडाळ्याकडे होतं, कधी सहा वाजतायत आणि मी घरी जातेय असं तिला झालं होतं.
संध्याकाळी घरी आल्यावर जिन्यापाशी स्वप्नील उभाच होता. ती शाळेतून येण्याची वेळ त्याला माहिती होती. कल्याणीला अडवत त्याने विचारलं
”कल्याणी पाहिलंस का ग्रिटिंग? आणि वाचलीस का तू चिठ्ठी?”
”हो वाचली” तिने लाजत उत्तर दिलं.
”मग काय विचार केलाय तू?” त्याने अधिरतेने विचारलं
”आता नाही, मग सांगते” तिच्या गालावरची ती लाली पाहून तिच्या मनात काय चाललं आहे हे त्याला कळलं. ती लिफ्टमध्ये चढली.

(पूर्वार्ध)
तीन फुल्या, तीन बदाम

© सर्व हक्क सुरक्षित