हेल्मेट नसणाऱ्या दुचाकींस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नसल्याच्या सक्तीला मुंबईसह राज्यभरातील पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. या विषयावर तातडीने तोडगा न निघाल्यास या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही असोसिएशनने दर्शवली आहे. यासाठी आज, बुधवारी असोसिएशन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या राज्यभरात ६ हजारांहून अधिक तर मुंबईत २२३ इंधन वितरक आहेत. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नसल्याची घोषणा केल्याने ग्राहक आणि वितरकांत वादावादी होण्याची शक्यता आहे. तसेच शासन परिपत्रकातले आदेश डावलून पेट्रोल पंप वितरकांनी दुचाकीस्वारांना पेट्रोल दिल्यास पंपचालकांवर गुन्ह्य़ाकरिता मदत केल्याची कारवाई शक्य होणार आहे.
यामुळे या सक्तीविरोधात पेट्रोल डिलर्स असोसिएशन मुंबईने विरोध करण्यासाठी आज, बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. याविषयावर तोडगा न निघाल्यास न्यायालयात जाणार असल्याचेही पेट्रोल डिलर्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी सांगितले.