भर उन्हात खेळत असताना समोर तलाव दिसला तर कुणालाही पाण्यात डुबकी मारण्याचा मोह होणारच. असाच मोह नऊ वर्षांच्या एका मुलीला झाला आणि तलावातील पाण्याचा अंदाज नसल्याने ती पाण्यात बुडू लागली. तलावाकाठी बसलेल्या एका जलतरणपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या चौदा वर्षीय मुलाने हे दृष्य पाहिले आणि क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात सूर मारला आणि त्या मुलीचा जीव वाचवला. एखाद्या चित्रपटात शोभणारे हे दृष्य शनिवारी संध्याकाळी मलबार हिलच्या बाणगंगा तलावात घडले.
कृष्णा पाष्टे ही मुलगी तलावात बुडत असताना मोहित दळवी या मुलाने तिचा जीव वाचवला. दिव्याला राहणाऱ्या कृष्णाने नुकतीच तिसरीची परिक्षा दिली. उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने तसेच मे महिन्यात एक लग्न असल्याने ती मलबार हिलच्या बारकुंडनगर येथे राहणाऱ्या आपल्या मामाकडे आली होती. तेथे घराजवळच बाणगंगा तलाव आहे. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास या तलावात काही मुले अंघोळ करत होती. उन असल्याने तिलाही पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. काही वेळ काठावर राहून ती खोल पाण्यात गेली. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिचे पाय चिखलात रुतले. त्यामुळे तिने शेजारीच पोहत असणाऱ्या अन्य एका मुलीचा हात धरला आणि दोघी बुडू लागल्या. तेथे उपस्थित असणाऱ्या मोहितने हा प्रकार पाहिला. त्याने प्रसंगावधान दाखवत पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्या कृष्णाला तलावाबाहेर काढले. पण तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने फेस येत होता. तिला उपचारासाठी एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. रुग्णालयाने कृष्णाचा सर्व उपचार विनामूल्य केला.

अनाथ मोहितवर कौतुकाचा वर्षांव
मोहित हा अनाथ असून तो बाणगंगा झोपडपट्टीत घरकाम करणाऱ्या आपल्या आत्याकडे रहातो. पालिका शाळेत शिकणाऱ्या मोहितने नुकतीच सहावीची परिक्षा दिली आहे. भविष्यात त्याला जलतरणपटू व्हायचे आहे. यामुळेच त्याने पोहण्याची आवड लहानवयापासूनच जोपासली आहे. त्याने केलेल्या धाडसामुळे मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काळे यांनी त्याचा सत्कार केला. त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्याला शासकीय स्तरावर पदक मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काळे म्हणाले. मोहित उत्तम पोहतो. मला स्विमिंगमध्ये करियर करायचे आहे, असे मोहितने सांगितले.