मर्यादित स्वरूपाचे पारंपरिक ऊर्जास्रोत आणि त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता भविष्यात जास्तीत जास्त नागरिकांनी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करावा, या हेतूने ठाणे जिल्ह्य़ातील भाईंदरजवळील उत्तन येथील केशवसृष्टीत शनिवारी आयोजित विशेष कार्यशाळेत मुंबई-ठाणे परिसरातील ३ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी सौरकुकरमध्ये अन्न शिजविले. अपारंपरिक ऊर्जावापराच्या या संस्काराची गिनीज बुकात नोंद होणार असल्याची माहिती केशवसृष्टीचे उपाध्यक्ष सतीश सिन्नरकर यांनी दिली. गिनीज बुकच्या वतीने तीन साक्षीदार या वेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, उद्योजक विठ्ठल कामत यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सुटय़ा भागांच्या आधारे आपापल्या सौरकुकरची जुळणी केली. त्यानंतर त्यात त्यांनी शेवया, गाजर आणि मटारची भाजी (व्हेजिटेबल नूडल्स) केली. अध्र्या तासात शिजलेल्या या चविष्ट पदार्थावर ताव मारल्यावर जुळणी केलेला कुकर घेऊन विद्यार्थी घरी गेले.