पुणे महानगरपालितेच्या हद्दीलगतच्या ३४ गावांची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याबाबत विचार होऊ शकतो, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केले. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा पालिका क्षेत्रात समावेश करण्याबाबतचा वाद सुरु आहे. या ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याऐवजी त्या गावांची मिळून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार आहे का, असा प्रश्न काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ३४ गावांच्या समावेशाच्या प्रस्तावावर आधी ग्रामविकास विभागाकडे सुनावणी होणे आवश्यक आहे. तेथील अहवाल येईल, त्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.  हा धोरणात्मक निर्णयाचा विषय आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.