कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचा अहवाल; ‘तंबाखूरहित मुंबई पोलीस स्टेशन’ मोहीम
पोलिसांना सततच्या कामामुळे मोठय़ा प्रमाणात ताण निर्माण होतो, त्या ताणाला दूर करण्यासाठी पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचारी तंबाखूचे सेवन करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. यासाठी जागतिक तंबाखूरहित दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए) या संस्थेने मुंबई पोलिसांसाठी ‘तंबाखूरहित मुंबई पोलीस स्टेशन’ ही मोहीम सुरू केली होती. एका वर्षांच्या मोहिमेत मुंबई पोलिसांच्या काही पोलीस ठाण्यांतील पोलिसांचे तंबाखू खाण्याचे प्रमाण ७०हून ४५ टक्के इतके झाले आहे.
२०१४ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात मरीन ड्राइव्ह, माता रमाबाई मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, सायन, माटुंगा, वरळी, धारावी, मलबार हिल, नागपाडा, भायखळा कारागृह आणि माहीम या पोलीस ठाण्यांमधील ७० टक्के पोलीस तंबाखूचे सेवन करत असल्याचे निदर्शनात आले होते. यानंतर त्यांचे सतत समुपदेशन आणि तणाव व्यवस्थापन या कार्यक्रमावर भर दिल्याने अनेक पोलिसांनी तंबाखू सोडल्याचे संस्थेने सांगितले.
अनेक पोलिसांना कामाचा तणाव असल्याने तणाव घालवण्यासाठी पोलीस तंबाखूचे सेवन करत असतात. मात्र तंबाखू सेवन करणाऱ्यांना कर्करोगाची शक्यता जास्त असल्याने अशा प्रकारची मोहीम संस्थेद्वारे राबवण्यात आल्याचे संस्थेच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर्स यांनी सांगितले. सीपीएएने नियमित घेतलेल्या शिबिरामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे आमच्या पोलीस ठाण्यातील कित्येक पोलिसांनी तंबाखूची सवय सोडून दिली आहे. माझ्या ऑर्डरलीला तोंडाचा ‘फायब्रोसीस’ होऊनही दररोज २५ गुटख्याची पाकिटे तो खात होता, मात्र सीपीएएने त्याच्या नियमितपणे केलेल्या समुपदेशनामुळे आणि पाठपुराव्यामुळे त्याने तंबाखू संपूर्णत: सोडून दिल्याची माहिती वडाळ्यातील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कसबे यांनी दिली.
स्पोर्ट्स क्लब आणि व्यायामशाळांमध्येदेखील अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना संस्थेला मिळालेली आहे. वेळोवेळी तोंडाच्या आरोग्याची तपासणी, आरोग्य प्रसार धोरणे तसेच जागृती घडवून आणल्यास कर्करोगापासून वाचवता येऊ शकते असे संस्थेने सांगितले.