सिंचन घोटाळ्यांवरून सरकारची पुरती बदनामी होत असली तरी याच आघाडी सरकारने गेल्या तीन वर्षांत तब्बल ५०० सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून यंदा आणखी ९० प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, अशी ग्वाही राज्यपालांनीच आज विधिमंडळातील अभिभाषणाद्वारे दिली. जनतेच्या हिताच्या विविध योजनाही सरकारने प्रभावीपणे राबविल्याचे प्रशस्तीपत्र देत राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी सरकारचा निवडणूकनामाच जाहीर केला.
 विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सोमवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात झाली. राज्यपालांनी गेल्या तीन वर्षांत सरकारने जास्तीत जास्त पाटबंधारे प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा अभिभाषणात केला. पाटबंधारे प्रकल्पांना गती देऊन अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी सरकारने नियोजन प्रक्रियेचा आढावा घेतल्याने सन २००९-१० पासून आतापर्यंत तब्बल ५०० सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलप्रभाव कमी करण्यात पोलिसांना यश आले असून वर्षभरात ४९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पोलीस दलात पाच वर्षांत ६१ हजार नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार  आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजाचे अरबी समुद्रातील स्मारक, छत्रपती शाहू महाराजांचे कोल्हापुरातील स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील स्मारकाचे प्रकल्प सरकारने मार्गी लावले आहेत. राजीव गांधी जीवनदायी, मागणी आधारित रक्त पुरवठा, अन्न सुरक्षा, मनोधैर्य, सुकन्या आदी योजनांच्या माध्यमातून कामे केल्याचेही नमूद केले.  शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान आधारित पीक विमा योजना फळ पिकांबरोबरच आता अन्य धान्यासह अन्य पिकांसाठीही प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे. २५ जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियान राबविण्यात येत असून त्यासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.