कोठडी मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने वारंवार आदेश देऊनही कोठडी मृत्यूंचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही हे शुक्रवारी पुन्हा एकदा उघड झाले. जानेवारी २०१५ ते मे २०१६ या कालावधीत ५१ कोठडी मृत्यू झाल्याचा अहवाल सरकारतर्फे उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. कोठडी मृत्यूंसंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

या प्रतिज्ञापत्रानुसार जानेवारी २०१५- मे २०१६ या कालावधीत मुंबईत ५१ कोठडी मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील २५ पोलीस कोठडीत, तर २७ न्यायालयीन कोठडीत झाले आहेत.  या प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीची दखल घेत याच कालावधीत मुंबईवगळता राज्यात किती कोठडी मृत्यूंची नोंद झाली याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.