पालिकेचा इशारा; ५४ फेरीवाल्यांना नोटीस

एका विशिष्ठ वस्तूंच्या विक्रीसाठी देण्यात आलेल्या परवान्याचा वापर करुन अन्य  वस्तूंची विक्री करणारे, पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या, तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या दक्षिण मुंबईमधील ५४ फेरीवाल्यांवर पालिकेने नोटीस बजावली असून २४ तासात अटी-शर्तीनुसार व्यवसाय करीत नसल्याचे आढळल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. पालिकेने घेतलेल्या या पवित्र्यामुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

दक्षिण मुंबईमधील महात्मा गांधी मार्गावरील तरुणाईमध्ये परिचित असलेल्या ‘फॅशन स्ट्रीट’वर मोठय़ा प्रमाणावर तयार कपडय़ांचे स्टॉल्स फेरीवाल्यांनी थाटले आहेत. त्यामुळे कपडे खरेदीसाठी येथे कायम वर्दळ असते. येथे २०१० पूर्वी परवानाधारक ३९४ फेरीवाले होते. येथील फेरीवाल्यांना चप्पल निर्मिती, दुरुस्ती, पान-वीडीचा स्टॉल्स आदी विविध व्यवसाय करण्यासाठी पालिकेकडून परवाने देण्यात आले होते. मात्र काही फेरीवाले परवान्यातील अटी व शर्तीचा भंग करून वेगळ्याच वस्तूंची विक्री करीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेने २०१० मध्ये नोटीस बजावून ३९ जणांचे  परवाने रद्द करण्यात आले होते. आजही अनेक फेरीवाल्यांकडून अटी आणि शर्तीचा भंग होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

विशिष्ठ व्यवसायासाठी परवाना दिलेला असताना काही जण तयार कपडय़ांची विक्री करीत आहेत. या  फेरीवाल्यांना १.५ मीटर बाय १.५ मीटर जागा देण्यात आली असून त्यापुढील पदपथावरील मोकळ्या जागेत लोखंडी व लाकडी बांबूच्या साह्यने स्टॅण्ड बनवून कपडे विक्रीसाठी टांगण्यात येत आहेत. पदपथावर अतिक्रमण करून वस्तू विक्रीला ठेवल्या जात आहेत. परवानाधारक फेरीवाला स्टॉलजवळ कधीच उपलब्ध होत नसून काही स्टॉल्स चालवायला देण्यात आले आहेत, तर काही स्टॉल्सचा कारभार परवानाधारकाचे कामगार पाहात असल्याचे निदर्शनास आले आहे. पादचाऱ्यांना विक्रेत्यांकडून त्रास दिला जातो. फेरीवाल्यांच्या उपद्रवाबाबत रहिवाशी संघटनांनी पालिकेकडे तक्रार केली असून या तक्रारीची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे.

‘फॅशन स्ट्रीट’ची पाहणी केल्यानंतर अटी आणि शर्तीचा भंग करणाऱ्या ५४ फेरीवाल्यांवर पालिकेने नोटीस बजावली आहे.

पादचाऱ्यांना होत असलेला त्रास, फेरीवाल्यांकडून अटी-शर्तीचे केले जाणारे उल्लंघन व पदपथावरील अतिक्रमण लक्षात घेऊन त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली आहे. फेरीवाले नियमानुसार व्यवसाय करीत नसतील तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल.   – किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय