दोन महिन्यांत ७०० प्राणी-पक्षी पावसामुळे जखमी; प्राणीप्रेमी संस्थांच्या धावपळीमुळे अनेकांचे जीव वाचले

पावसाळी हवामान आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यांचा त्रास माणसांना होऊ लागला असतानाच पावसाच्या माऱ्याचा फटका मुंबईतील प्राण्या-पक्ष्यांनाही बसला आहे. जोरदार पावसामुळे गेल्या दोन महिन्यांत जवळपास ७०० प्राणी-पक्षी जखमी झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या अधिक असून यातील बहुतांश जिवांवर प्राण्यांसाठीच्या विशेष रुग्णालयांत उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचू शकले.

मुंबईत मान्सूनच्या फटक्यात अनेक प्राणी-पक्षी जखमी झाल्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. शहरातील नाले-ओढे, तलाव भरून वाहिल्याने रस्त्यावर येणारे सरपटणारे प्राणी जखमी होत असून पावसाच्या सरींचा फटका बसून पक्षी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडत आहेत. त्याचबरोबरीने जोरात आलेल्या पावसाने घाबरून कुत्रे-मांजर रस्त्यावर येऊन वाहनांच्या धडकेत जखमी होत असल्याच्या घटनाही वाढत आहेत.

मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये जखमी झालेल्या प्राण्यांमध्ये माकडे, कासवे, नाग, घोणस, धामण व अन्य सरपटणारे प्राणी असून कासवांत ऑलिव्ह रिडले कासव, स्टार टॉरटॉईज आदी कासवांचा समावेश आहे.

पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो, मोर, गरुड, सी-गल, नवरंग, घार, घुबड, पोपट आदींसह अन्य समावेश असून ‘बूबी बर्ड’ हा स्थलांतरित दुर्मीळ पक्षीही जखमी अवस्थेत आढळला. ओढे-नाले भरून वाहिल्याने कासवे व साप झाडा-झुडपांत अडकल्याने जखमी होत असल्याचे ‘पॉझ’चे सुनिश कुंजू यांनी स्पष्ट केले. तर पावसात रस्त्यावर आलेल्या प्राण्यांचा वाहनांच्या धडका बसून मृत्यू व जखमी होण्याचे प्रकार अधिक असून यात कुत्रे व मांजरांचा समावेश आहे, असे परळच्या बाई साखरा बाई रुग्णालयाच्या कर्नल (निवृत्त) जे. सी. खन्ना यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना सांगितले.

मुंबईतील ‘रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ (रॉ), ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी’ (पॉझ) या संस्था जखमी प्राण्यांना वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पक्षीप्राणी जखमी झाल्याचे समजल्यानंतर या संस्थांचे प्रतिनिधी त्यांना रुग्णवाहिका व स्वत:च्या वाहनाने ठाण्यातील एसपीसीए प्राण्यांचे रुग्णालय, कासवांसाठी डहाणू येथील कासवांचे रुग्णालय तसेच परळ येथील बाई साखरा बाई प्राणी रुग्णालयात दाखल करत आहेत. याबाबत सांगताना ‘रॉ’चे पवन शर्मा म्हणाले की, पावसाळ्यात प्राणी जखमी अवस्थेत सापडल्याच्या अनेक घटना समोर येत असून अनेक जण समाजमाध्यमांद्वारा आमच्याशी संपर्क साधत आहेत.

जून व जुलै महिन्यात जखमी प्राणी-पक्षी

‘रॉ’ संस्था-

  • सरपटणारे प्राणी – १५२
  • ९० विषारी सर्प, ५४
  • बिनविषारी सर्प, ८
  • निमविषारी सर्प
  • पक्षी – ८५
  • कासवे – १४
  • खार – ३
  • माकड-१