नाहूर गावात टोलेजंग इमारती उभारण्यात येणार असून त्यासाठी तब्बल ७०० झाडांची कत्तल करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक झाडांचे पुनरेपण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी भविष्यात ती झाडे जीवंत राहतील की नाही याबाबत उद्यान विभागातील अधिकारी साशंक आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने कत्तल होणारी वृक्षवल्ली वाचवायची की सिमेंटच्या जंगलासाठी हिरवाईवर करवत चालविण्यास परवानगी द्यायची हे वृक्षप्राधिकरण समितीच्या हाती आहे.
वृक्षवल्लीने नटलेल्या नाहुल गावामध्ये आलिशान इमारती उभारण्याच्या ऑबेरॉय कन्स्ट्रक्शनचा मानस आहे. या इमारतींच्या आड येणारी २४६ झाडे तोडण्याची आणि ४५४ झाडांचे पुनरेपण करण्याची परवानगी विकासकाने २२ जानेवारी २०१५ रोजी अर्ज करून पालिकेकडे मागितली आहे. आंबा, फणस, पेरू, वड, कडुनिंब, उंबर, नारळ, सुपारी, पिंपळ, निलगिरी, चिंच आदी झाडांचा त्यात समावेश आहे. यापैकी काही झाडांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे, तर काही ५० वर्षे जुने वृक्ष आहेत. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून तो वृक्षप्राधिकरण समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, पुनरेपणासाठी सुचविण्यात आलेले वृक्ष भविष्यात जगतील की नाही याबाबत शाश्वती नाही, असे पालिकेच्या उद्यान विभागातील एका अधिकाऱ्यांने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.  या वृक्षतोडीला परवानगी मिळावी यासाठी काही राजकारणी मंडळी सक्रिय झाली आहेत.
दरम्यान, माहीम, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, गोरेगाव, चेंबूर, विक्रोळी आदी भागात विकासाआड येणाऱ्या ५०० झाडांवरही करवत चालविण्यात येणार असून त्याबाबतचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.