सन २००६ मध्ये औरंगाबादेत जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्याच्या खटल्यात मोक्का न्यायालयाने आरोपी अबु जुंदालसह ११ जणांना गुरुवारी दोषी ठरवले. उर्वरित दहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. शुक्रवारी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी पक्षाने सर्व आरोपींवर लावलेला संघटित गुन्हेगारीसाठीचे मोक्का कलम न्यायालयाने निकाल देताना वगळले आहे. २००२ मधील गुजरात दंगलीनंतर तेथील तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात आरोपींनी कट रचला होता, असेही निरीक्षण मोक्का न्यायालयाने मांडले.
२००६ मध्ये औरंगाबादजवळ दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला होता. सुमो आणि इंडिका या दोन गाड्यांमधून हा शस्त्रसाठा मनमाडकडे घेऊन जाण्यात येत होता. यामध्ये ३० किलो आरडीएक्स, १० एके ४७ रायफल यांच्यासह इतर शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन गाड्यांपैकी एक गाडी अबु जुंदाल चालवत होता, असे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले. एकूण २२ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना दोषी ठरविण्यात आले. दहा जणांची निर्दोष सुटका करण्यात आली.