मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावरही आठवडाभरात वातानुकूलित लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीसाठी म्हणून वातानुकूलित लोकल मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये आणण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलची चाचणी घेण्यासंदर्भात रेल्वे मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या लोकलच्या चाचण्या घेण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेवर तीन ते चार महिने या वातानुकूलित लोकलची चाचणी होणार आहे. पुढील दोन महिने पश्चिम रेल्वेवर विविध मार्गावर या चाचण्या घेण्यात येणार असून त्यात अनेक गोष्टींची तपासणी करण्यात येणार आहे. वातानुकूलित लोकलच्या चाचण्यांसाठी बीएचईएल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) व आरडीएसओच्या (रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनाइझेशन) अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे या आठवडय़ापासून चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.

चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून मुंबईत गेल्या वर्षी ५ एप्रिल रोजी दाखल झालेली बहुचर्चित वातानुकूलित लोकलची चाचणी यापूर्वी मध्य रेल्वेवर यशस्वीपणे पार पडली आहे. या लोकलची उंची सामान्य लोकलच्या उंचीपेक्षा जास्त असल्यामुळे ती आता पश्चिम रेल्वेवर चालविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्या दृष्टीने या चाचण्या घेण्यात येणार आहेत.

रेल्वे बोर्डाकडून पश्चिम रेल्वे मार्गावर चाचणी करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर चाचण्या सुरू करून वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी सज्ज करण्यात येईल.

– रवींद्र भाकर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे