भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी रविवारी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. हाजी अली दर्ग्यातील ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत दर्ग्यात हजेरी लावली.  दर्गामध्ये प्रवेश करत असताना यावेळी कोणताही विरोध झाला नसल्याने अधिक  आनंद झाल्याचे सांगत मुस्लीम महिलांकडूनही समर्थन मिळत असल्याबद्दल तृप्ती यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.  हाजी अली दर्ग्यात सध्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच महिलांना परवानगी आहे. दर्ग्यातील ‘मजार-ए-शरीफ’मध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांना समान अधिकार असल्याने बंदी उठविण्याचा निर्णय देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर राज्य सरकार आणि हाजी अली विश्वस्त समितीने महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, विश्वस्तांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दर्गा विश्वस्तांची ही मागणी न्यायालयाने मान्य करत निकालाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे  तृप्ती देसाई यांनी सध्या विशिष्ट मर्यादेपर्यत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाच्या नियमांचे पालन करत दर्शन घेतले. यापूर्वीही त्यांनी हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले होते. यावेळी त्यांना जोरदार विरोधाला सामोरे जावे लागले होते.

Really happy that no one objected us from entering Haji Ali Dargah, so many Muslim women supported us: Trupti desai pic.twitter.com/qWeABJSaOc