पोलीस दलातील हरवलेला संवाद पुन्हा सुरू व्हावा यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहे. पोलिसांच्या अडचणी तसेच समस्या आणि रजेबाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या हद्दीत दरबार भरवावा, अशी सूचना करण्यात आली आहे. उपायुक्तांनी दर महिन्याला तर अतिरिक्त आयुक्तांनी तीन महिन्यांतून एकदा असा दरबार भरवून प्रत्येक पोलिसाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रत्येक उपायुक्ताने दुपारी एक वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात येऊच नये तर त्याने त्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात जाऊन फेरफटका मारावा. आपण स्वत: फोन करून उपायुक्त कार्यालयात नाही ना याची शहानिशा करणार आहोत, असे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले. पोलिसांचा वावर रस्त्यावर दिसला पाहिजे, असा आमचा जसा आग्रह आहे. तसाच त्यांच्या अंतर्गत समस्यांही सुटाव्यात आणि पोलीस ठाण्यातही सौहार्दाचे वातावरण राहावे, असे आमचे प्रयत्न असल्याचे भारती यांनी सांगितले. वाकोला येथील घटनेनंतर याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे उपायुक्तांनी पोलिसांना भेटून त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. ओआर पुन्हा सुरू व्हायला हवा. पोलिसांसाठी उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांकडून आयोजित केलेला दरबार हा त्याचाच भाग असेल, असेही भारती यांनी सांगितले.