मापात पाप करुन सर्वसामान्य घर खरेदीदारांची फसवणूक करण्याऱ्या बिल्डरांना चाप लावणारे अप्पर पोलीस महासंचालक संजय पांडे यांची पुणे येथे कमी महत्त्वाच्या पदावर केलेली बदली अखेर रद्द करण्यात आली. त्यांना वैधमाप शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यासाठी या पदाची श्रेणीवाढ करण्यात आली आहे.
भ्रष्टाचाऱ्यांना व गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसवूनही गेली कित्येक वर्षे अडगळीच्या जागांवरच नियुक्ती दिली जाते, ते ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची आठ महिन्यांपूर्वी वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदावर नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वजन व मापे यांच्या आधारावर आर्थिक व्यवहार होतात, ते सर्व व्यवसाय वैधमापन कायद्याच्या कक्षेत आणले. बिल्डरही क्षेत्रफळ मोजून घरे विकत असतात. त्यामुळे घराचे क्षेत्रफळ बरोबर आहे, असे वैधमापन विभागाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सदनिका खरेदी-विक्रीची नोंदणी करायची नाही, असा आदेश त्यांनी राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना काढले. त्यामुळे बिल्डर लॉबीमध्ये खळबळ उडाली. त्याचवेळी त्यांच्या बदलीसाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली होती.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, त्यांची पुणे येथे महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष येथे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या आधी त्या जागेवर पोलील उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रमुख होते. त्यामुळे त्यांची दुय्यम जागेवर नेमणूक करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. विधान परिषेदत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, कर्तव्यदक्ष अधिकारी संजय पांडे यांची बदली का केली, असा प्रश्न उपस्थित केला होता.