राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्या बचावासाठी शनिवारी शिवसेना पक्ष पुढे सरसावला . शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून पारसकरांवरील आरोप सिद्ध झाले नसतानाही, प्रसारमाध्यमांकडून त्यांची अकारण बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारच्या आरोपांमुळे संबंधित अधिकाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अकारण बदनामी आणि मनस्ताप सहन करावा लागतो. न्यायालयाचा निकाल येणे बाकी असूनही पारसकर यांना दोषी ठरवून त्यांच्यावर टीका करणे अयोग्य असल्याचे सांगत, शिवसेनेने पारसकरांना पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीसुद्धा ट्विटरवरून अशा प्रकरणांची सुनावणी प्रसारमाध्यामांमध्ये होण्यापेक्षा न्यायालयात होणे अधिक योग्य ठरेल असे सांगत पारसकरांची बाजू मांडली.

काही दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय मॉडेलने राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक सुनिल पारसरकर यांच्याविरोधात बलात्कार आणि विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. महिला अत्याचारविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.