नव्याकोऱ्या गाडीत जाहिराती लावण्यासाठी कंत्राटाची विचारणा
देशातील पहिली वातानुकूलित लोकल गाडी मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार याबाबत अनिश्चितता असली तरी या गाडीत आपापल्या उत्पादनांच्या जाहिराती करण्यासाठी जाहिरातदार पुढे सरसावले आहेत. या गाडीत जाहिरातींचे कंत्राट रेल्वे कधी काढणार, अशा विचारणा होऊ लागल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले. साध्या लोकल गाडय़ांमध्ये जाहिराती लावण्यासाठी जाहिरातदार वर्षभरासाठी पाच लाख रुपये भरतात. मात्र या वातानुकूलित गाडीतील जाहिरातीसाठी वर्षांचे ३२ लाख रुपयांचा दर आकारला जाणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
वातानुकूलित गाडी मध्य रेल्वेवर चालणार असल्याचे खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केल्यापासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना या गाडीच्या आगमनाची प्रतीक्षा होती. ५ एप्रिलला ही गाडी मध्य रेल्वेवर दाखल झाली असली, तरी त्या गाडीत विद्युत यंत्रणा बसवण्यापासून काही कामे अद्यापही कुर्ला कारशेडमध्ये चालू आहेत. किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी सध्या साध्या लोकलगाडय़ांमध्ये जाहिराती करणारे जाहिरातदार या वातानुकूलित गाडीतील जाहिरातींच्या कंत्राटाबद्दल विचारणा करत आहेत. लवकरच यासाठी निविदा निघणार आहे. हे कंत्राट तीन वर्षांसाठीचे असल्याचा फटका रेल्वेला बसणार आहे. कारण प्रतिसाद पाहून दरवर्षी रेल्वेला दर वाढवण्याची मुभा नसेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दुरंतो गाडीच्या धर्तीवरच जाहिरातदारांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. ही गाडी स्वयंचलित दरवाज्यांची असल्याने ती जागाही जाहिरातदारांना वापरण्यास मिळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.