‘केबीसीच्या सहाव्या पर्वाला मी जड अंतकरणाने पूर्णविराम देत आहे. पण, हा भाग, हे पर्व संपवतानाच पुन्हा एकदा नवे पर्व घेऊन मी प्रेक्षकांच्या भेटीला येईन, अशी आशाही मनात कुठेतरी मूळ धरून आहे. या जाणिवेसकट मी या पर्वाचा निरोप घेतो आहे’, अशा शब्दांत ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘कौन बनेगा करोडपती’ हा ‘गेम शो’ सुरू झाल्यापासून अमिताभ बच्चन सूत्रसंचालक या नात्याने ‘शो’शी आणि त्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांशी जोडले गेले आहेत. अमिताभ आणि ‘केबीसी’ची लोकप्रियता हे अजब समीरकण होऊन बसले आहे. त्यामुळे एक सलग पाच पर्व त्यांनी पूर्ण केली. अपवाद फक्त तिसऱ्या पर्वाचा. तिसऱ्या पर्वासाठी शाहरूख खान याने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती. पण, त्याला यश न मिळाल्याने ही ‘हॉट सीट’ पुन्हा अमिताभ यांच्याकडेच आली. गेल्या सहा पर्वामध्ये या ‘शो’चे स्वरूपही बदलले आणि देशातील सुदूर खेडय़ात असलेल्या लोकांनाही या ‘शो’मध्ये सहभागी होत जिंकण्याची संधी मिळाली. या त्याच्या बदलत्या स्वरूपामुळे अमिताभ भावनिकरित्याही या ‘शो’शी जोडले गेले आहेत, याची प्रचिती त्यांनी ट्विटरवर केलेल्या मनमोकळ्या विधानातून दिसून येते.
‘केबीसीचे सहावे पर्वही संपले. आता एकप्रकारे रिकामपणाची भावना माझ्या मनात हळूहळू निर्माण होऊ लागली आहे. मनात एक अपराधीपणाची भावना आहे. ही भावना नेमकी काय आहे हे शब्दांमध्ये व्यक्त क रणेही कठिण आहे’, अशा शब्दांत ‘बिग बी’ने आपल्या मनातील चलबिचल व्यक्त केली.
केबीसीच्या नव्या पर्वातून परतण्याचा आशावाद व्यक्त करणाऱ्या ‘बिग बी’नी ‘शो’च्या अंतिम भागातीलकाही छायाचित्रेही ट्विटरवर टाकली आहेत. केबीसीचा अखेरचा भाग हा प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर चित्रीत करण्यात आला असून तो त्याचदिवशी प्रसारित होणार आहे.