एटीएममध्ये भरण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्या व्हॅनमधील २ कोटी रुपयांची रोकड लुटण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी विलेपार्ले येथे घडली. या कटात कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याचा सहभाग आहे.
बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे कंत्राट एका खाजगी कंपनीकडे देण्यात आले होते. याच कंपनीतील एका कर्मचाऱ्याने एटीएम व्हॅन लुटण्याची ही योजना अतिशय पद्धतशीरपणे आपल्या साथीदारांच्या मदतीने आखली होती.
या कंपनीची व्हॅन शुक्रवारी संध्याकाळी वरळीहून अंधेरीच्या दिशेने निघाली होती. या व्हॅनमध्ये या आरोपी कर्मचाऱ्यासह दोन अन्य कर्मचारी आणि चालक होता. आरोपी कर्मचाऱ्याने लोअर परळ येथे चहा पिण्याच्या निमित्ताने या दोन सहकाऱ्यांना उतरवले. चहात गुंगीचे औषध टाकले. काही वेळाने मिलन सबवे जवळ हे दोन्ही कर्मचारी बेशुद्ध पडताच ठरल्याप्रमाणे एका खाजगी गाडीतून या आरोपीचे साथीदार आले. त्यांनी ही व्हॅन थ्थांबवून चालकाला मारहाण केली आणि गाडीत टाकलेले २ कोटी रुपये पोबारा केला. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून बेशुद्ध कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.