उत्तम सेवेमुळे मुंबईकरांच्याच नाही, तर ठाणे, नवी मुंबई येथील प्रवाशांच्या पसंतीला उतरलेल्या उबर-ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयकांकडून काही शिकण्याऐवजी रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांनी पुन्हा एकदा प्रवाशांना कोंडीत पकडण्यासाठी संपाचे हत्यार उगारले आहे. गेल्या महिन्यात याच मुद्दय़ावर रिक्षा-टॅक्सी चालकांचा एक दिवसाचा संप करणाऱ्या जय भगवानदादा महासंघाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे मंगळवार, २६ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणेच खासगी टॅक्सी समन्वयकांना नियमावली लागू करावी, ही या संघटनेची प्रमुख मागणी आहे. या संपात ९० टक्के रिक्षा-टॅक्सी सहभागी होणार असल्याचा दावा महासंघाने केल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

उबर, ओला अशा खासगी टॅक्सी समन्वयक कंपन्यांनाही सरकारी नियमाची बंधने घालायला हवीत, त्यांचे दरपत्रक निश्चित करायला हवे, अशा मागण्यांसाठी विविध रिक्षा-टॅक्सी संघटना गेली दोन वर्षे आंदोलन करत आहेत. गेल्या महिन्यात २१ जून रोजी जय भगवानदादा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा फटका मुंबईकरांना बसला होता.

  • ओला-उबर या कंपन्यांच्या टॅक्सी चालकांनाही गणवेश, गाडीला मीटर, चालकाला बिल्ला आदी गोष्टी नियमाप्रमाणे लागू कराव्यात, अशी जय भगवानदादा महासंघाची मागणी आहे.