टायर निर्मितीत अग्रेसर असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या (बीकेटी) संचालक पातळीवरील अधिकाऱ्यांनी केलेल्या दंडेलीविरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रारदार उच्च न्यायालयात गेल्यानंतर गुन्हा दाखल केला. त्यानंतरही या गुन्ह्य़ात मनासारखा तपास व्हावा, म्हणून हा गुन्हा सदर इंडस्ट्रीज असलेल्या पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केले होते. मात्र याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढताच आयुक्तांवर आदेश मागे घेण्याची नामुष्की आली आहे.

इंडियन टायर तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य असलेले राजन बिडये हे बाळकृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीत वरिष्ठपदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतरही कंपनीने त्यांना तीन वर्षे मुदतवाढ दिली. परंतु गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०१६ मध्ये कंपनीतील काही वरिष्ठ अधिकारी सुरक्षा रक्षकासह बिडये यांच्या टिळकनगर येथील घरी आले. त्यांनी राजन बिडये आणि टाटा कर्करोग रुग्णालयातून सायंटिफिक अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या त्यांच्या पत्नी श्रद्धा (६०) यांच्यासोबत दंडेली करीत लॅपटॉप, पेनड्राइव्ह ताब्यात घेऊन त्यांना कंपनीच्या लोअर परळ येथील कार्यालयात नेले. त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्य़ा घेण्यात आल्या. याबद्दल कोठे वाच्यता केल्यास खोटय़ा प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली.  या प्रकारानंतर बिडये यांनी आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या. उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याला दिले. सहायक निरीक्षक उत्कर्ष वझे यांनी या दाम्पत्याला बोलाविले. परंतु गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे या दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि टिळकनगर पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल केला. परंतु पोलीस आयुक्तांनी गुन्ह्य़ाचा तपास ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याकडे सोपविण्याचे आदेश दिले होते.

  • ज्या ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली होती. अशा या पोलिसांकडून तपास कसा होणार, असा आक्षेप या दाम्पत्याने उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्यावेळी घेतला. त्याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढताच आधीचा आदेश रद्द करीत तपास पुन्हा टिळकनगर पोलीस ठाण्याकडे सोपविण्याचे आदेश सहआयुक्त देवेन भारती यांनी जारी केले. याबाबत भारती यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.