• वातानुकूलित बस गाडीचा मासिक पासही स्वस्त होणार
  • मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची मंजुरी

सातत्याने प्रवासी संख्या आणि उत्पन्न घसरत असल्याने बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासनाने वातानुकूलित बस गाडय़ांचा स्वस्त प्रवास आणि प्रवास भाडय़ाच्या टप्प्यात सुसूत्रीकरण करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या बैठकीत अखेरची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता १ जुलैपासून मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास अखेर स्वस्त होणार आहे.

गेल्या वर्षभरात बेस्टची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी दोनदा भाडेवाढ करण्यात आली. मात्र यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. दोन वर्षांपूर्वी ३५ लाखांवर असणारी बेस्टची प्रवासी संख्या २८ लाखांवर घसरली. त्यामुळे तिकीट दर वाढवून काहीच ‘बेस्ट’ होत नसल्याने बेस्टच्या भाडेसूत्रात बदल करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला. यात प्रवास भाडेटप्प्यात नव्याने ८, १२, १७, २५, ३५, ४५ या टप्प्याचा समावेश करण्यात आला. याशिवाय वातानुकूलित गाडय़ांचे तिकीट दरांसह मासिकपासही स्वस्त करण्यात आले. यावर बेस्ट समिती आणि महापालिकेच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची अखेरची मंजुरी महत्त्वाची होती. अखेर बुधवारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकणाने यावर शिक्कामोर्तब केल्याने आता मुंबईकरांचा बेस्टचा प्रवास स्वस्त होण्याचा मार्ग मोकाळा झाला आहे. या मंजुरीनंतर १ जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली. तर याबाबत बेस्ट समितीची गुरुवारी बैठक होणार असून यात त्यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ निर्णय

बेस्टपासून दुरावलेल्या प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी पॉइंट टू पॉइंट सेवा, आनंद यात्री योजना, ई-पर्स योजनेअंतर्गत ५० रुपये शिल्लक ठेवण्याची अट रद्द, कमिशन तत्त्वावर बस गाडय़ांचे आरक्षण. मुंबई महानगरपालिक हद्दीबाहेरील बससेवेवरील अतिरिक्त प्रवासभाडे रद्द करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मासिक पासही स्वस्त

सध्या प्रवाशांकडून २४ दिवसांच्या तिकिटांवर मासिक पास आकारला जातो. आता हाच पास २२ दिवसांवर आकारला जाणार आहे. म्हणजेच ६६ दिवसांच्या तिकिटाच्या शुल्कावर प्रवाशांना ९० दिवस प्रवास करता येणार आहे. याचप्रमाणे मॅजिक बस पासाचेही पुन:मूल्यांकन केले जाणार आहे.

Untitled-19