राज्यात शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार तग धरून असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ व त्यानंतर होणाऱ्या जाहीर सभेपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांना एका व्यासपीठावर एकत्र ठेवण्यात अडचण असल्याने श्रेयाच्या कुरघोडीत राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या उद्धव ठाकरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी मुंबईबाहेर जाणे पसंत केले असून ते बीड येथे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जाणार असल्याचे शिवसेनेतील उच्चपदस्थांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता स्मारकाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये, असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी ठाकरे यांना मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर आमंत्रित केले जाऊ नये, असे बुधवारी सायंकाळपर्यंत तरी ठरले होते. या कार्यक्रमास राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, थावर चंद गेहलोत, राज्यमंत्री संतोष गंगवार, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले. मात्र ठाकरे यांना आमंत्रित केले जाणार का, असे विचारूनही सर्वानाच आमंत्रण आहे, एवढेच सांगितले.
आमंत्रणावरून राजकीय कुरघोडी व मानापमान नाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर त्या दिवशी ठाकरे यांनी मुंबईबाहेर जाणे पसंत केले आहे. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देणे हे अधिक महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेतील उच्चपदस्थांनी सांगितले. जाहीर सभा महायुतीतर्फे घेण्यात आली असती तर शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने ठाकरे यांना व्यासपीठावर मोदी यांच्या समवेत बसविणे, भाजपला भाग पडले असते. पण सभाही एमएमआरडीएतर्फे होणार असल्याने ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापणे राजशिष्टाचारानुसार आवश्यक राहिलेले नाही.