मुंबईचा नियोजित विकास आराखडा चुलीत घाला, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली टोकाची भूमिका, काँग्रेस आणि मनसेचा विरोध यातून भाजप लक्ष्य होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर या आराखडय़ास भाजपने विधानसभेत बुधवारी विरोध दर्शवीत आपल्यावर होणाऱ्या टीकेतून सुटका करून घेतली आहे. महापालिकेने करार केलेल्या सल्लागार कंपनीने हा आराखडा तयारच केलेला नाही, असा आरोप भाजपचे आशीष शेलार यांनी करून याच्या चौकशीची मागणी केली.
मुंबईवरील चर्चेत सहभागी होताना शेलार यांनी, मुंबईच्या विकास आराखडय़ात साराच घोळ झाल्याचे सांगत या साऱ्यांची निवृत्त सनदी अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी केली. विकास आराखडय़ास शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे या साऱ्याच पक्षांनी विरोध केला असताना भाजप या आराखडय़ाचे समर्थन करीत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. जनमानसात भाजपच्या विरोधात वातावरण तयार होत असल्याची कल्पना आल्यानेच मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेल्या शेलार यांनी सभागृहातच या आराखडय़ास विरोध केला. आता साऱ्याच पक्षांचा विरोध असल्याने या प्रस्तावित आराखडय़ाबाबत सरकारला फेरविचार करावा लागणार आहे.
आराखडा तयार करण्याचे काम एससीई या सल्लागार कंपनीला देण्यात आले होते. पण हा आराखडा मे. इजिस जिओ प्लॅन या कंपनीने तयार केला. या दोन कंपन्यांचे एकत्रिकरण झाले असल्यास तशी महापालिकेकडे नोंद करण्यात आली नव्हती, असा आरोपही शेलार यांनी केला. हा प्रस्तावित आराखडा इंग्रजीमध्ये असून, मुंबई महापालिकेच्या कारभाराची भाषा मराठी असल्याने हरकती व सूचना मागविण्यासाठी हा आराखडा मराठीमध्ये तयार केला जावा व नंतर ६० दिवसांची मुदत दिली जावी, अशी मागणी शेलार तसेच सुनील प्रभू (शिवसेना) यांनी केली. धनिकांचा फायदा करून देणारा आणि चटईक्षेत्र निर्देशांकाची रेलचेल करणारा हा आराखडा असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
विमानतळ जवळ असल्याने अंधेरी परिसरात इमारती किती उंच असाव्यात यावर बंधन  आहे. मात्र या आराखडय़ात आठ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या विरोधाभासाकडे जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) यांनी लक्ष वेधले. चटईक्षेत्र निर्देशांक वाढवून मुंबईच्या नागरी सुविधांवर पडणारा ताण कसा कमी करणार, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. करून दाखविले अशी जाहिरातबाजी करणाऱ्या शिवसेनेने बेस्टची भाडेवाढ करून गोरगरीब जनतेला फसविल्याचा आरोप वर्षां गायकवाड (काँग्रेस) यांनी केला. केंद्र आणि राज्याकडून मुंबई महापालिकेला भरीव मदत मिळावी, अशी अपेक्षा सदा सरवणकर (शिवसेना) यांनी केली.