औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका हातात हात घालून लढविण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनास भाजपने पहिल्या टप्प्यातच अनुकूल प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती राहील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज ठाकरे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर जाहीरच केले.
औरंगाबादमध्ये एमआयएमचे आव्हान उभे असल्याने, मतविभागणी टाळावी यासाठी शिवसेना भाजपसेबोत युती करण्यासाठी उत्सुक होती. तसे संकेत सेनेच्या वर्तुळातून अगोदरपासूनच दिले जात होते.
स्वत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनीच काल तसे आवाहन केल्यानंतर आज भाजपचे
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जाल्यानंतर आपली ही पहिलीच सदिच्छा भेट होती, असे त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले, पण या भेटीतच, नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेतील युतीच्या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.