जवळपास वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. ‘भिकाऱ्यांना पैसे देण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा’ असं एक आवाहन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एका सरकारी प्रकाशनातूनच केलं होतं. वरवर पाहता हे काहीसं विचित्र, गंभीर आणि आक्षेपार्हही वाटल्यानं मी तेव्हा थोडा खोलात शिरलो होतो.
मग खुलासे होत गेले.
मुंबईच्या त्या वेळच्या गणनेनुसार, दररोज भीक मागणाऱ्यांची संख्या काही लाखांच्या आसपास होती. हा एक संघटित व्यवसाय आहे हे आता लपून राहिलेलं नाही. यापैकी सुमारे नव्वद टक्के लोक उपनगरी रेल्वेत भीक मागतात. सहाजिकच, त्यांची उलाढाल रोख पैशात होते. म्हणजे, अन्न, जुने कपडे किंवा भिकाऱ्याला देऊन टाकता येतील अशा वस्तू स्वीकारणारे भिकारी मुंबईत फार कमीच आढळतात.
त्या वेळच्या, माहितीनुसार, मुंबईतील उपनगरी रेल्वेतून दररोज सुमारे चाळीस लाख प्रवासी येजा करत असत. यापैकी किमान दहा लाख प्रवासी, म्हणजे फक्त पंचवीस टक्के, सह्रदयतेने भिकाऱ्याच्या पसरलेल्या हातावर किमान एक रुपया ते कमाल पाच रुपये एवढा स्वकमाईतील म्हणजे स्वच्छ पांढरा असलेला पैसा ठेवत असे. याचा अर्थ, मुंबईकरांच्या खिशातील किमान दहा लाख ते कमाल पन्नास लाख रुपये दररोज भिकाऱ्याला दान म्हणून दिले जात असावेत.
या भिकाऱ्यांच्या टोळ्यांमधील किमान दहा टक्के ते कमाल पन्नास टक्के लोक भीक मागून मिळणारा पैसा व्यसनांवर उधळतात, असेही सांगितले जाते. म्हणजे मुंबईकरांनी मानवतेच्या भावनेने किंवा पुण्य मिळविण्याच्या भावनेने दिलेल्या पैशातील एक दशांश, किमान एक लाख ते पाच लाख रुपये, अनैतिक धंद्यांच्या व्यवहारात वळतात. ही दररोजची उलाढाल गृहीत धरली, तर मुंबईकराची पुण्यभावनेने खर्च केलेल्या रकमेतील साडेतीन कोटी ते पंधरा कोटी एवढी रक्कम वर्षाकाठी काळ्या धंद्याकडे वळते. म्हणजे, मानवतेच्या भावनेने खर्च केलेला पैसाही, वाममार्गालाच लागतो.
….म्हणून त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनात मला तथ्य वाटले होते!
आज मुद्दा वेगळा आहे.
छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने अरुंधती रॉय यांना दिलेल्या पुरस्कारावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा मार्गाने पैसे मिळविले असतील तर त्यातून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारणे हा दांभिकपणा असल्याचा आक्षेपही घेतला जात आहे.
… पण ह्या पुरस्काराची एक  लाखाची रक्कम रमाबाई मिशनला देण्याचे अरुंधती रॉय यांनी जाहीर केले आहे!
… या दोन मुद्द्यांतील विरोधाभास गमतीदार आहे.
– सन्मार्गाने मिळविलेला, घामाचा, पुण्यभावनेने दिलेला पैसाही नकळत वाममार्गाला जातो, हा एका संदर्भाचा संदेश!
– कथित वाममार्गाने मिळविलेला पैसाही सहजपणे सन्मार्गाला जातो, हा दुसऱ्या संदर्भाचा संदेश!
– पैशाचे खेळ अनाकलनीय असतात, हेच खरं!!