न्यायालयाच्या सूचनेनंतर मुंबई महापालिकने गणेशोत्सव धोरण जाहीर केले असून मंडपांना केवळ ३० फूट उंची पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ध्वनीप्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक नियम घालून देण्यात आलेले आहेत.
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण, मंडपामुळे होणारी वाहतूक कोंडी आदींच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने पालिकेला गणेशोत्सव धोरण आखण्याची सूचना केली होती. त्यानुसार पालिकेने हे धोरण तयार केले आहे. तयार केलेल्या या गणेशोत्सव धोरणात मंडपाची उंची केवळ ३० फूटांपर्यंत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंडपाच्या उंचीबरोबरच त्याच्या लांबी रुंदीचा आराखडा तयार करताना तो परवानगी अर्जासोबत जोडावा लागणार आहे. याशिवाय २५ फूंटांवरील सर्व मंडपांना स्ट्रक्चरल प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडपाचा आराखडा पालिकेबरोबरच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांना सादर करावा लागणार आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियामक मंडळाचीही परवानगी घ्यावी लागणार आहे. उत्सवाची परवागनी ३० दिवस आधी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा, रुग्णालये परिसरात मोठय़ा आवाजांच्या ध्वनीक्षेपकांवर बंदी घातली आहे. यावर्षांपासूनच या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.