मुंबई महानगरपालिकेकडून बुधवारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १४ हजार ५०० रूपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत कर्मचारी आणि पालिका प्रशासनात वाद सुरू होता. वस्तू आणि सेवा कर, बंद झालेला जकात कर आणि नोटाबंदीमुळे गतवर्षीइतका बोनस देणे शक्य नसल्याचे सुरूवातीला प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. तर वेतनाच्या सरासरी २० टक्के म्हणजे ४० हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. त्यासाठी ५ ऑक्टोबरला कामगार संघटनांकडून  मोर्चाही काढण्यात आला होता.

गुंतवणूकदारांना यंदा ‘भागविक्री’तून वाढीव बोनस!

या दरम्यानच्या काळात कामगार संघटना, महापौर आणि पालिका आयुक्त यांच्या अनेक बैठकाही झाल्या. दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची तयारी अजोय मेहता यांनी दर्शविली. मात्र बंद झालेला जकात कर, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी आणि नोटाबंदी आदी विविध कारणे पुढे करीत कर्मचाऱ्यांना गतवर्षीइतका बोनस देणे शक्य नसल्याचे अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नव्हता. अखेर आज पालिकेकडून कर्मचाऱ्यांना १४ हजार ५०० रूपये इतका बोनस जाहीर करण्यात आला. हा बोनस केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये बोनस देण्यात आला होता.