वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील पुलाखालील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौकीबाहेर उभ्या असलेल्या कामगाराला भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने शुक्रवारी धडक दिली. या धडकेत कामगार ठार झाला. मुकुंद कांबळे असे या कामगाराचे नाव आहे. या घटनेच्या  पाश्र्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. संबंधित चौकी सुरक्षित स्थळी न हलवल्यास आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील कांबळे  शुक्रवारी सकाळी सातच्या  सुमारास या चौकीबाहेर उभे होते. त्यावेळी भरधाव मोटारसायकलने त्यांना धडक दिली. कांबळे यांना तातडीने शीव रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पूर्वी ही चौकी तेलंग रोडवर होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाने या चौकीचे तीन दिवसांपूर्वीच वडाळा येथे स्थलांतर करण्यात आले. चौकीचे नवे स्थळ अन्यत्र हलवावे अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत होती. या मागणीचा तातडीने विचार न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस गोविंद कामतेकर यांनी दिला आहे.