मुंबई महानगरपालिकेने सोमवारी (दि. २४) आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १४ हजार रूपये तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ५५०० रूपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा महापालिका प्रशासनाने केली आहे. गतवर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना १३५०० रूपये तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ५००० रूपयांचा बोनस देण्यात आला होता.
महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस ५०० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. याचा फायदा ४५ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
१ लाख ९ हजार पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे. याशिवाय पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्या वर्षीपेक्षा ५०० रुपयांनी जास्त बोनस दिला जाणार आहे.