वास्तुविशारद, सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’निशी बांधकामास मंजुरी देण्याबाबतचे नवीन धोरण लवकरच
इमारतीच्या मूळ रचनेला धक्का न पोहोचवता घरामध्ये अंतर्गत बदल करण्यासाठी बंधनकारक असलेली पालिकेच्या परवानगीची अट शिथिल करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून पालिका त्याबाबत नवे धोरण आखत आहे. या धोरणानुसार वास्तुविशारद आणि सोसायटीच्या ‘ना-हरकत’ प्रमाणपत्राच्या आधारे शौचालय, प्रसाधनगृह, स्वयंपाकगृह वगळता घरातील अन्य भागांत फेरबदल करणे शक्य होणार आहे. मात्र, या धोरणामुळे मुंबईतील सुखदा-शुभदासह अनेक इमारतींमधील सदनिकांमध्ये करण्यात आलेले अंतर्गत फेरबदल नियमित होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये घरांमध्ये हवे तसे अंतर्गत फेरबदल करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही वेळे फेरबदल करताना इमारतीच्या मूळ रचनेतच फेरबदल केले जातात. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण होतो. त्यामुळे घरामध्ये अंतर्गत फेरबदल करण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र पालिकेची परवानगी न घेताच असे फेरबदल करण्यात आल्याची अनेक प्रकरणे पालिका दरबारी प्रलंबित आहेत.
घरांमध्ये छोटे-छोटे अंतर्गत बदल करण्यासाठी परवानगी मिळावी याकरिता नागरिकांना पालिकेच्या विभाग कार्यालयात अनेक वेळा खेटे घालावे लागतात. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अंतर्गत फेरबदलासाठी पालिका प्रशासन नवे धोरण आखत आहे. या धोरणानुसार वास्तुविशारदाकडून प्रमाणपत्र आणि सोसायटीकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेतल्यानंतर संबंधितांना आपल्या घरात छोटे-मोठे अंतर्गत बदल करणे शक्य होणार आहे. त्यासाठी भविष्यात पालिकेची परवानगी बंधनकारक नाही. मात्र, इमारतीची मूळ रचना, घरातील शौचालय, प्रसाधनगृह आणि स्वयंपाकाच्या खोलीमध्ये वास्तुविशारद आणि सोसायटीचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेऊन फेरबदल करता येणार नाहीत. त्यासाठी पालिकेकडेच परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबतचे धोरण अद्याप आखण्यात येत असून त्याला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल, असे पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
वरळी येथील शुभदा-सुखदा सोसायटीसह मुंबईतील अनेक इमारतींमधील सदनिकांमध्ये अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहेत. यांपैकी काही प्रकरणे न्यायप्रविष्टही आहेत. तसेच काही प्रकरणे पालिका दरबारी धूळ खात पडली
आहेत. पालिकेच्या नव्या धोरणामुळे यापूर्वीच घरांमध्ये अंतर्गत फेरबदल करणाऱ्यांची बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.