वर्षभराच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांना १५ कोटी देणार

सफाई कामगारांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रशासनाने पालिकेच्या उपनगरीय आणि विशेष रुग्णालयांमध्ये साफसफाई करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.  सत्ताधारी शिवसेना-भाजपने संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. रुग्णालयांची एक वर्ष साफसफाई करण्यासाठी कंत्राटदारांना १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

पालिकेच्या सफाई कामगारांची संख्या कमी असल्यामुळे उपनगरीय रुग्णालये आणि विशेष रुग्णालयामधील साफसफाई योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे या रुग्णालयांतील साफसफाईसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या कामासाठी क्रिस्टल इंटीग्रेटेड, ब्रिस्क फॅसिलिटी आणि बीव्हीजी इंडिया या तीन कंपन्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर केला होता.

तीनपैकी एक कंपनी भाजपच्या नेत्याची असून या कंपनीला कंत्राट देण्यास विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. सफाई कामगारांची संख्या अपुरी आहे, मग रिक्त पदे का भरण्यात येत नाहीत? मृत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची अनेक प्रकरणे रखडली आहेत. असे असताना रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी प्रशासन कंत्राटदाराची नियुक्ती करीत आहे. पालिकेमध्ये खासगीकरण करण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप प्रवीण छेडा यांनी या वेळी केला.

रुग्णालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदारांवर कडक अटी लागू करण्यात आल्या आहेत. चांगले काम न करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कंपनीला मुदतवाढ दिली जाणार नाही. पालिकेचे सफाई कामगार नसतील अशाच रुग्णालयांमध्ये कंत्राटदारामार्फत सफाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी भूमिका शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत मांडली. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला.