पालिकेकडून रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात

महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने महानगरपालिकेचे खड्डय़ांबाबतचे दावे धुऊन निघाले असून चार दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे शहरभर खड्डेभरण मोहीम सुरू झाली आहे. पावसानेही उघडीप दिल्याने खड्डय़ांवर मलमपट्टी करण्यासाठी वॉर्ड कर्मचारी खडी व डांबराचे ट्रक घेऊन निघाले आहेत. मात्र मधल्या काळात जोरदार पाऊस पडल्यास ही खडीही वाहून जाण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिकेवर विसंबून न राहण्याचे ठरवले आहे.

पावसाळ्याआधी शहरातील अनेक रस्त्यांच्या पृष्ठीकरणाची कामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे या वेळी पावसात खड्डे कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच महापालिका आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांकडे रस्त्यांची जबाबदारी सोपवली असल्याने खड्डे पडल्यास ते तातडीने बुजवले जाण्याची शक्यता होती. मात्र पृष्ठीकरण केलेले रस्ते वगळता जुलैच्या मध्यावर आलेल्या जोरदार पावसाने इतर रस्त्यांची अवस्था बिकट केली आहे. त्यानंतर रस्त्यांवर केलेली मलमपट्टी गेल्या तीन दिवसांतील पावसाने धुऊन काढली. पालिकेच्या कारखान्यातील खडी-डांबराचे मिश्रण पावसात वाहून जात असल्याने गेल्या महिन्यात बुजवलेले अनेक खड्डे शनिवार-रविवारच्या पावसात पुन्हा उघडे पडले. पश्चिम उपनगरातील वीर सावरकर रस्ता, लिंक रोडवर अनेक ठिकाणी खड्डय़ांची चाळण झाली. अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसर, भांडुप, कुर्ला, घाटकोपरमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या व त्यानंतर खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या. गणेशोत्सव चार दिवसांवर आल्यावर व सुदैवाने पावसाने उघडीप दिल्याने मंगळवारपासून खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेतले असल्याची माहिती एका वॉर्ड अधिकाऱ्याने दिली. गणपती आगमन-विसर्जनाच्या रस्त्यांवर विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने या ठिकाणी मिडास टच व स्मार्टफील मिश्रण वापरण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत पालिकेकडून या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना खड्डे भरण्यासाठी बोलावणे पाठवले जात आहे.

ऑस्ट्रियाच्या तंत्राचे मिडास टच करणारी इकोग्रीन आणि इस्रायलच्या तंत्राचे स्मार्टफिल करणाऱ्या स्मार्टएज या कंपन्यांकडून पालिकेने या वेळी खड्डे भरण्यासाठी मिश्रण मागवले होते. इकोग्रीन व स्मार्टएज या दोन्ही कंपन्यांकडून प्रत्येकी १९ लाख टन असे ३८ टन मिश्रण ७० लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. भर पावसात हे मिश्रण वापरणे शक्य असले तरी प्रत्येक खड्डय़ासाठी सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो.

‘विनंती करून आम्ही थकलो’

गेल्या अनेक वर्षांत रस्त्यावरील खड्डे गणेशमंडळांच्या पाचवीला पुजले आहेत. महापालिकेला विनंती करून आम्ही थकलो आहोत. आजमितीला ८० ते ८५ टक्के गणपती मंडपात पोहोचले आहेत, आता विसर्जना वेळी रस्ते नीट ठेवण्याची गरज आहे. त्या वेळीही पालिकेवर अवलंबून न राहता आम्ही पोलादी पट्टय़ा, गोणपाट अशा पारंपरिक उपायांचा अवलंब करणार आहोत, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिबावकर म्हणाले.