केवळ माणूसच नव्हे तर, सर्वच जीवसृष्टीच्या निर्मिताला ईश्वर, अल्ला असा कुणी जबाबदार नाही. त्यामुळे त्यावर आधारलेले भाग्य, नशिब आत्मा हे थोतांड आहे. भाग्य, नशिबाच्या भ्रामक कल्पनेतून समाजाने बाहेर यावे व सत्याचा, विज्ञानवादाचा स्वीकार करावा यासाठी जनजागृतीचा भाग म्हणून गोवंडी येथे २४ डिसेंबरला भाग्य-आत्मा दहन उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
त्याचाच पुढचा भाग म्हणून उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचा सर्व धर्मियांमध्ये प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती या उत्सवाचे प्रमुख संयोजक अरविंद सोनटक्के यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला बौद्ध धम्माचा स्वीकार करताना व आपल्या लाखो अनुयायांना धम्मदीक्षा देताना रुढी, पंरपरा, आत्मा-इश्वर, भाग्य, नशिब असल्या भ्रामक कल्पनांची नाळ तोडून त्यांना विज्ञानाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. धम्म दीक्षा देताना आजही त्याचा वापर केला जातो. परंतु स्वतला बौद्ध म्हणवून घेणारा समाजही अजून पूर्णपणे अंधश्रद्धामुक्त झालेला नाही. त्याचा सातत्याने अनुभव येत असल्याने त्यातून २२ प्रतिज्ञा अभियान अशी एक चळवळ सुरु करण्यात आली. या अभियानाचे संस्थापक अरविंद सोनटक्के असून त्यांनी ही चळवळ महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

मुंबईत ६ डिसेंबरला दर वर्षी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. परंतु अनेकांच्या हातात, गळ्यात, दंडात गंडे-दोरे दिसतात. २२ प्रतिज्ञा अभियानाच्या वतीने दर चैत्यभूमीवर गंडे-दोरे कापण्याची मोहीमच उघडण्यात येते. जमलेल्या गंडय़ा-दोऱ्यांचे २४ डिसेंबरला दहन करणे, असा प्रतिकात्मक कार्यक्रम केला जातो. त्याला हळू-हळू सकारात्मक व चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी साडे तीन ते चार लाख गंडे-दोरे कापले होते. या वर्षी दोन ते अडीच लाख गंडे मिळाले, अशी माहिती सोनटक्के यांनी दिली.  

आता २२ प्रतिज्ञा अभियानाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सर्वच धर्मिंयांनी अंधश्रद्धेला तिलांजली देऊन विज्ञानाची कास धरावी यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २४ डिसेंबरला देवनार-गोवंडी येथे शहिद अशोक कामटे मैदानावर सांयकाळी ५ ते रात्री ९ दरम्यान भाग्य-आत्मा दहन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सर्व जीवसृष्टीच्या निर्मितीला अल्ला वा ईश्वर जबाबददार नाही.

जीवसृष्टीच्या निर्मितीबाबत चार्ल डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. अभियानाने त्याचा सर्व धर्मियांमध्ये प्रचार करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात भाग्य-आत्मा दहन उत्सवातून होणार आहे, असे त्यांनी सांगितले.