बहुतांश एटीएम बंद, बँकांबाहेरही रोकड नसल्याचे फलक

एरवी सर्वसामान्य नोकरदारांसाठी सुदिन असलेला महिन्याच्या पहिल्या तारखेचा दिवस गुरुवारी ‘काळा’ दिनच ठरला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खणखणणाऱ्या मोबाइलमधील मेसेजने पगार जमा झाल्याची आनंदवार्ता तर दिली; पण हा पगार काढायचा कुठून, या विवंचनेने प्रत्येकालाच ग्रासले असल्याने हा आनंद अल्पजीवीच ठरला. तरीही मोठय़ा आशेने एटीएम गाठणाऱ्यांना नोटांच्या खडखडाटामुळे हिरमुसल्या चेहऱ्याने परतावे लागले, तर इतके दिवस रडतखडत का होईना, रोकड ‘अदा’ करणाऱ्या बँकांनीही गुरुवारी मान टाकली. त्यामुळे बहुतांश बँकांमध्ये गुरुवारी शुकशुकाट होता. घरकाम, वाणसामान, विविध बिले आदींसाठी पगार जमा होताच पैसे काढणाऱ्यांचा शिरस्ता नोटाबंदीनंतरच्या ‘पहिल्या तारखे’ला मोडला.

पाचशे-हजाराच्या चलनबंदीमुळे गेले तीन आठवडे बँकांबाहेर ओसंडून वाहणारी गर्दी आणि लांबच लांब रांगांची रीघ काल गुरुवारी दिसत नव्हती. बहुतांश बँकांच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बँकांमध्ये दुपारनंतर शुकशुकाटच पाहायला मिळत होता. दुपारच्या भोजन विश्रामानंतर दादर आणि वडाळ्यामधील बहुतांश बँकांचे ‘शटर’ खाली ओढलेले दिसत होते, तर काही बँकांच्या दारावरच ‘नो कॅश’चे फलक झळकत होते. काहींनी ‘फक्त पसे स्वीकारले जातील’ अशी पाटी लावल्याने पैसे काढण्याच्या अपेक्षेने आलेले ग्राहक आल्या पावली परतत होते.

वडाळा पश्चिमेकडे एरवी तुफान गर्दी असणाऱ्या देना बँक, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक अशा बँकांबाहेर चिटपाखरूही नजरेस पडत नव्हते, तर आयसीआयसीआय बँकेच्या दरवाजावर ‘नो कॅश’ची पाटी झळकत होती. बँकेत पसेच नसल्याने दुपापर्यंत फक्त पसे भरण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होती, असे बँकेच्या बाहेर असलेल्या सुरक्षारक्षकाने सांगितले. अशीच काहीशी परिस्थिती दादर विभागातील बँकांबाहेरही दिसत होती.

काही दिवसांपूर्वीपर्यंत दादर-वडाळा विभागातील रहिवाशांच्या थोडय़ाफार पशांची सोय भागवणारी काही एटीएम केंद्रेही गुरुवारी बंद असल्याने मोठी समस्याच निर्माण झाल्याचे चित्र दिसले. याउलट उच्चभ्रू वस्तीमधील बँकांच्या शाखेत मात्र परिस्थिती निराळीच दिसत होती. कुलाबा शाखेतील स्टेट बँकेतील सर्व खिडक्या गर्दीने ओसंडून वाहत होत्या. बँकेमध्ये पुरेशी रोकड असल्याने आणि काल १ तारीख असल्याने वेतन काढण्यासाठी आलेल्या वेतनधारकांची संख्या वाढली असल्याचे एका बँक कर्मचाऱ्याने सांगितले. याशिवाय आजूबाजूला उच्चभ्रू वस्ती असल्याने नवीन दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

गेले काही दिवस मी बँकेमध्ये पसे भरण्यासाठी येत होतो. जेव्हा मला पशांची गरज भासते आहे त्या वेळी मात्र बँकांमध्ये पशांचा अभाव आहे. तसेच गेले काही दिवस रडतरडत का होईना चालणारे एटीएम केंद्रही दोन दिवस बंद असल्याने सगळ्याच आशा मावळल्या आहेत.

निरंजन जाधव, वडाळा, बँक ऑफ इंडिया शाखेबाहेर

अजून माझा पगार झालेला नाही. मात्र बँकेमधील परिस्थिती पाहण्यासाठी मी आलो होतो. पण एकूणच परिस्थिती पाहता  यंदा  पगार वेळेत हातात पडेल असे वाटत नाही.

अशोक पाडावे, दादरमधील सारस्वत बँकेच्या बाहेर