गुजरातमधील सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणात शहा यांना केवळ राजकीय कारणांसाठी गोवण्यात आल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. बी. गोसावी यांनी मंगळवारी हा निकाल सुनावला. या निर्णयामुळे शहा यांच्याविरोधात असलेले खून, अपहरण आणि गुन्ह्य़ाचा कट हे सर्व आरोप फेटाळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाचा सर्वव्यापक विचार केल्यास शहा यांच्यावरील आरोप न पटणारे आहेत, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. शहा यांना या प्रकरणात केवळ राजकीय कारणांसाठी गोवण्यात आल्याचा प्रतिवाद या प्रकरणी बचाव पक्षाचे वकील असलेल्या एस. व्ही. राजू यांनी केला होता. हा प्रतिवादही न्यायालयाने मान्य केला.
सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर २००५मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. तसेच त्याची बायको त्यानंतर गायब झाली होती. तिलाही मारण्यात आल्याचे बोलले जात होते. सोहराबुद्दीनचा मदतनीस तुलसीराम याने ही बनावट चकमक पाहिली होती. मात्र, पोलिसांनी डिसेंबर २००६मध्ये छपरी गावाजवळ त्यालाही चकमकीत ठार मारले होते. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग असल्याचे बोलले जात होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना जुलै २०१० मध्ये अटकही केली होती. ऑक्टोबरमध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता.