रेल्वे प्रवासात प्रवाशांसमोर टाळ्या पिटत बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना लोकलच्या डब्यात ‘प्रवेशबंदी’ करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने एक आगळीवेगळी युक्ती शोधली आहे. रेल्वे गाडीच्या डब्यात तृतीयपंथीयांना प्रतिबंध घालण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने थेट तृतीयपंथीयांच्या प्रमुखाला भेटून आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपनगरीय रेल्वे प्रवासाप्रमाणे लांब पल्ल्यांच्या गाडय़ातून प्रवास करताना अनेक स्थानकांतून तृतीयपंथीय रेल्वे गाडीच्या डब्यात शिरकाव करतात. रेल्वे गाडीच्या डब्यात येताच प्रवाशांना धडकी भरवणाऱ्या टाळ्या पिटत बळजबरीने पैशांची मागणी करतात. यात पैसे देण्यास नकार दिल्यास तृतीयपंथीयांकडून प्रवाशांशी असभ्य वर्तन केले जाते. या विरोधात प्रवाशांकडून तक्रारी केल्या जातात. याची दखल घेत मध्य रेल्वे सुरक्षा दलाने तृतीयपंथीयांना रेल्वेच्या डब्यात प्रतिबंध करण्यासाठी तृतीयपंथीय यांच्या प्रमुखाची मदत घेणार असल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.

कारवाई
वर्ष                                प्रकरण            दंड
२०१५                          १४००        ७ लाख   २७ हजार ३९०
२०१६ (एप्रिलपर्यंत)    ४९८           २ लाख ८८ हजार ९००