शासकीय नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणासाठी मराठा समाजाचे निघत असलेल्या विराट मोर्चामुळे अस्वस्थ झालेल्या ओबीसी समाजानेही नाशिक येथे ३ ऑक्टोबरला महामोर्चा काढण्याचे ठरविले आहे. हा मोर्चा छगन भुजबळ समर्थकांचा असल्याचे सांगितले जात असले तरी, सर्वपक्षीय मराठा नेतृत्वाला शह देण्याची ओबीसी संघटनांची ही रणनीती असल्याचे मानले जात आहे.

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असली, तरी त्याची पूर्तता करणे तेवढे सोपे नाही. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण द्यावे, अशी एक मागणी आहे.  त्यातच मराठा मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांतील मराठा नेते सहभागी होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ आहे. मात्र मराठा मोर्चाला आव्हान देण्यासाठी प्रतिमोर्चा न काढता, भुजबळ यांच्या समर्थनार्थ व ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी हा मूक मोर्चा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.   माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक असणाऱ्या महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.